बेळगाव पासिंग च्या वाहनांतून ३ हजार जिलेटिन कांड्या जप्‍त | पुढारी

बेळगाव पासिंग च्या वाहनांतून ३ हजार जिलेटिन कांड्या जप्‍त

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीरपणे स्फोटके नेणारी दोन वाहने पूर्व विभाग पोलिस महानिरीक्षकांच्या (आयजी) स्क्‍वॉडने दावणगिरीनजीक पकडली. यातून 2,970 जिलेटिन कांड्या, 790 इलेक्ट्रिकल डेटोनेटर असल्याचे आढळले. जप्‍त केलेली वाहने बेळगाव पासिंगची असून याबाबत तपास केला जात आहे.

दावणगिरी तालुक्यातील आलूर गावानजीकच्या दगडाच्या क्‍वॉरीकडे स्फोटके नेण्यात येत होती. दगड फोडण्यासाठी याचा वापर करण्यात येणार होता, अशी माहिती मिळाली आहे. सदर स्फोटके बागलकोटहून दावणगिरीकडे नेण्यात येत होती. पण, ही वाहतूक करताना खबरदारी घेण्यात आली नसल्याचे चौकशीवेळी दिसून आले.

डीवायएसपी तिरुमलेश यांच्या नेतृत्वाखालील पथकाला बेकायदेशीररीत्या स्फोटके नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. वाहनांबाबत माहिती मिळवून छापा घालून कारवाई करण्यात आली. स्फोटके पाठवणार्‍या मालकाला ताब्यात घेतले असून चौकशी केली जात आहे. दावणगिरी ग्रामीण पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे. बेळगाव पासिंगची ही वाहने असल्यामुळे यामागे बेळगावातील काहींचा हात आहे का, याचा तपास केला जात आहे.

Back to top button