

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : दोघांचे भांडण सुरू असताना ते सोडवण्यास गेलेल्या ढाबाचालकाचा प्राण गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार एमके हुबळीत घडला आहे. फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेता यांचे 1500 रुपयांसाठी ढाब्यातच भांडण सुरू झाले.
फूलविक्रेता शेतकरी आपल्या गावचा म्हणून ढाबाचालक भांडण सोडवायला गेला. परंतु, विक्रेत्याने रागाच्या भरात पाण्याचा जग उचलून ढाबाचालकाच्या छातीवर व भुवईजवळ घाव घातले. त्यात ढाबाचालकाचा मृत्यू झाला.
प्रकाश नागनूर (वय 38, रा. बैलहोंगल) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक झाली असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अब्दुलअजीज मोहम्मद अली बडेगार (वय 38), महंमदशफी ऊर्फ सद्दाम रफीकअहमद बडेगार, शबीर रफीकअहमद बडेगार (28), इरफान मोदीनशा बडेगाह (29) आणि साजीद शबीरअहमद बडेगार (20, सर्व रा. एम. के. हुबळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रविवारी सायंकाळी एमके हुबळी येथील पंचवटी ढाब्यात ही घटना घडली. बैलहोंगल येथील फूल उत्पादक शेतकरी मंजुनाथ शंकर्याप्पा शिंत्रे याच्याकडून एमके हुबळीचा अजीज बडेगार हा फुले विकत घेत होता. अजिज महामार्गावरील पंचवटी ढाब्यात आल्याचे समजताच मंजुनाथ तेथे पैसे मागण्यासाठी गेला. मंजुनाथ व अजिजची आधी शाब्दिक चकमक उडाली. यानंतर ते दोघे व सोबत आलेले अन्य तरुण हमरीतुमरीवर आले. मंजुनाथ हा प्रकाशच्या गावचा असल्याने प्रकाश भांडण सोडविण्यासाठी गेला.
पाण्याच्या जगने छातीवर हल्ला
भांडण विकोपाला गेले असताना प्रकाश पुढे झाला. तो आपल्या गाववाल्याची बाजू घेत असल्याचे लक्षात आल्याने संतापलेल्या अजीजने पाण्याचा जग उचलून प्रकाशच्या छातीवर व भुवयांवर हल्ला केला. यामुळे प्रकाश जागीच कोसळला. त्याला तातडीने बैलहोंगल येथील रूग्णालयाकडे नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कित्तूरचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ कुसगल यांनी तातडीने तपास करत पाच जणांना अटक केली.