बेळगाव : स्वच्छतेवर खर्च 44 कोटी, तरी समस्या का मोेठी? | पुढारी

बेळगाव : स्वच्छतेवर खर्च 44 कोटी, तरी समस्या का मोेठी?

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील स्वच्छतेसाठी यंदा 44 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. म्हणजेच महिन्याला सुमारे साडेतीन कोटी आणि दिवसाला 12 लाख रुपये बेळगावच्या स्वच्छतेवर खर्च होतात.

इतका पैसा खर्च होऊनही बेळगाव अस्वच्छ का, असा प्रश्‍न असून अनेक उपनगरांचा कचरा वेळेवर उचलला जात नाही. शहराच्या मध्यवर्ती भागातही अशीच स्थिती आहे. त्यामुळेच बेळगावात कचराफेक आंदोलने वाढत आहेत.

महापालिका आयुक्‍तांच्या घरासमोर गेल्या रविवारी आमदार अभय पाटील यांनी आणि गुरुवारी महापालिकेसमोर काही कार्यकर्त्यांनी शहरात साचलेला कचरा नेऊन टाकला.

यामुळे शहरातील कचरा समस्या नव्याने उजेडात आली आहे. पुरेसा निधी, मनुष्यबळ असतानाही शहरातील कचरा अनेक दिवस का साचून राहतो, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिका दरवर्षी सर्वाधिक खर्च शहर स्वच्छतेवर करत आली आहे. गेली दोन वर्षे हा खर्च 32 लाख होता. यंदा तो 44 कोटी प्रस्तावित आहे. या रकमेचे कंत्राटही देण्यात आले आहे.

सध्या शहरातील 47 प्रभागांतील कचरा उचल 9 ठेकेदारांकडून केली जाते. तर, बाकीच्या 11 प्रभागांतील कचरा उचल महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांकडून होते. शहरात एकूण 58 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात सुमारे 6 ते 12 हजार लोकसंख्या आहे.

तर, सुमारे 1100 कामगार स्वच्छतेचे काम करतात. पर्यावरण विभागाला ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी दोन अभियंत्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

शहरात रोज अडीच ते तीनशे टन कचरा तयार होतो. तो सगळा जमा करावा, अशी अपेक्षा असते. पण, सारा कचरा जमा केला जात नाही.

कचरा उचलून तो तुरमुरीच्या कचरा डेपोमध्ये नेऊन टाकण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. तरीही कचर्‍याची समस्या दूर झालेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये संताप वाढत आहे.

गेल्या काही दिवसांपासून रस्त्यात कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

घंटागाडीत कचरा न टाकता तो रस्त्यात टाकण्यात येत असल्यामुळे कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचे स्वागत होत असताना महापालिकेचे कर्मचारी व्यवस्थित काम करत नसल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य दिसून येते.

कचरा समस्या वाढत असल्यामुळे डेंग्यू, मलेरियाचा प्रसार वाढतो आहे. त्यामुळेही लोकांचा संताप वाढत आहे. 44 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध असूनही शहर कचरामुक्त होत नसल्यामुळे महापालिकेला लोकांनी जाब विचारला तर चुकले कुठे, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे.

Back to top button