

उजळाईवाडी; पुढारी वृत्तसेवा : कोरोना प्रादुर्भावामुळे बंद पडलेली इंडिगो कंपनीची कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा एक ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. याबाबची माहिती कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली.
कोरोना महामारीमुळे देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद पडली होती. त्यामुळे देशांतर्गत धार्मिक स्थळांना जोडणारी विमान कनेक्टिव्हिटी प्रवासी नसल्याने बंद पडली होती. सहाजिकच कोल्हापूर तिरुपती विमान सेवा देखील अपवाद राहिली नाही.
परंतु, आता देशात सर्वत्र बाजारपेठ खुल्या झाल्याने आता बहुतांशी सर्व धार्मिक स्थळे येत्या काही दिवसात पूर्ववत सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोल्हापूर तिरुपती विमान सेवा देखील रविवार दिनांक एक ऑगस्टपासून पूर्ववत सुरू होण्याच्या मार्गावर आहे.
या संदर्भात कंपनीचे कोल्हापूर व्यवस्थापक विशाल भार्गव यांच्याशी संपर्क साधला असता याला दुजोरा दिला. आठवड्यातून चार दिवस ही सेवा सुरू राहील असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कोकणसह कोल्हापूर, सांगली, सातारा येथे अतिवृष्टीने हाहाकार उडाला. आता येथील पूर ओसरत असताना पुन्हा एकदा कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने आज मंगळवार (२७ जुलै) रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टचा इशारा दिला आहे.
तसेच बुधवार (दि.२८ जुलै) देखील ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
तर महिन्याच्या अखेरीस ३० जुलैला रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.