सांगली मध्ये अत्यावश्यकसह सर्व दुकाने सुरू | पुढारी

सांगली मध्ये अत्यावश्यकसह सर्व दुकाने सुरू

सांगली : पुढारी वृत्तसेवा सांगली मध्ये अत्यावश्यकसह सर्व दुकाने सुरू करण्यात येत आहे. महिनाभरानंतर जिल्ह्यातील सर्व व्यवहार सोमवारपासून सुरू झाले. कोरोना प्रतिबंधक नियमांनुसार जिल्हा तिसर्‍या टप्प्यांत गेल्याने अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू करण्यात येत आहेत. शनिवारी आणि रविवारी मात्र ती बंद राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने तसेच कोरोना पॉझिटिव्हीटी दर वाढल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतु, सध्या कोरोना रुग्णसंख्या स्थिर असल्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.

ते म्हणाले, किराणा, भाजीपाला, दुकाने, फळ विक्री, दूध, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी, मिठाई, पेट शॉप आदी दुकानांसह अन्य सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. घरपोच सेवेसाठी रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. दूध संकलन करण्यास मात्र वेळेचे बंधन घालण्यात आलेले नाही. जिल्ह्यातील सर्व भाजी मंडई सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू करण्यात आल्या आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील आठवडा बाजार मात्र अद्याप बंदच ठेवण्यात आले आहेत.

डॉ. चौधरी म्हणाले, शेती अवजारे, खते, बियाणे, शेतीपूरक साहित्य विक्रीची दुकाने पूर्वीच सुरू करण्यात आली आहेत. पशुखाद्य दुकानांना देखील व्यवहार करण्यास 4 वाजेपर्यंत परवानगी दिली असून घरपोच सेवेसाठी 8 पर्यंत परवागनी असेल.

ते पुढे म्हणाले, कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी हॉटेल, बार, रेस्टॉरंट इत्यादी बंद करण्यात आले होते. परंतु ती आता 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पार्सलसेवेसाठी मात्र रात्री 8 वाजेपर्यंत परवागी दिली आहे. तसेच रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्री स्टॉलला मात्र केवळ पार्सलसेवेसाठीच परवानगी देण्यात आली आहे.

ते म्हणाले, बंद करण्यात आलेली सर्व क्रीडांगणे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. चालणे, फिरणे, सायकल चालवणे यासाठी पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत परवानगी आहे. चित्रपट, मालिका यांच्या चित्रीकरणास देखील परवनगी देण्यात आली आहे. केशकर्तनालयाला देखील 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 पर्यंत परवानगी असेल.

केवळ 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभास परवानगी आहे. नियमभंग केल्यास 50 हजारांचा दंड आकारण्यात येईल. मंगल कार्यालयातील कर्मचार्‍यांचे तातडीने लसीकरण करणे गरजेचे आहे. तसेच लग्नसमारंभावेळी त्यांचे कोरोना निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे आवश्यक आहे. ते नसल्यास व्यक्तीस हजार रुपये आणि कार्यालय व्यवस्थापनास 10 हजारांचा दंड करण्यात येईल. प्रसंगी मंगल कार्यालय सील करण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व धार्मिक आणि प्रार्थनास्थळे मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ पुजार्‍यांना पूजा करण्यास परवानगी दिली आहे. मात्र सिनेमागृहे, नाट्यगृहे, मॉल्स, शॉपींग सेंटर, महाविद्यालये, खासगी क्लास यांना परवानगी नाही.

हे सुरू राहणार…

अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने सुरू
रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री स्टॉलला पार्सलसाठी मुभा
हॉटेल, बार, रेस्टॉरंट, सलून 50 टक्के क्षमतेने सुरू
क्रीडांगणे, मॉर्निंग वॉक, सायकलिंगसाठी परवानगी

हे बंद

धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंदच
सिनेमागृहे, नाट्यगृहे, महाविद्यलाये, शाळा, क्लास बंद
जलतरण तलाव, क्लब बंद
मॉल्स, शॉपिंग मार्केट बंदच राहणार

Back to top button