Wari 2022 : रिंगण… उत्साहाचे, आनंदाचे आणि एकीचे! | पुढारी

Wari 2022 : रिंगण... उत्साहाचे, आनंदाचे आणि एकीचे!

माळशिरसः पुढारी वृत्‍तसेवा :  विठ्ठल नामाचा महिमा फार मोठा आहे आणि विठ्ठल भक्त जगभर आहेत. शेकडो वर्षार्ंपासून पंढरीचा वारकरी ‘वारी चुको ने दी हरी’, हे लक्षात घेऊन वारीला जात आहे. वारीत सारे जण सहभागी होतात. कोणताही भेदभाव इथे नाही. अवघ्या महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा येथून आलेल्या वारकरी माऊलींची दिंडी ही सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे.

जन्म-मरणाची वारी चुकविण्यासाठी वारी करायची, अशी द़ृढ भावना प्रत्येक वारकर्‍यांच्या मनात असते. त्यासाठी टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी विठ्ठलाचा नामगजर करतो आणि मोक्षप्राप्तीसाठी संतांनी सांगितल्याप्रमाणे संकीर्तन करतो. वारीमध्ये भजन आणि कीर्तन या दोन मुख्य साधनांबरोबरच विविध फडांवर रंगणारी संतांची भारुडे, गवळणी, विहरणी, ओव्या, गोंधळ या माध्यमातून सांगितिक परंपरेचे दर्शन घडते. भजन हे वारकरी सांप्रदायाचे अविभाज्य अंग असून एकता, बंधुता अणि समरसतेचे प्रतीक आहे.

मुख्य भजन गायकाबरोबर कीर्तनावेळी शेकडो टाळकरी एकत्र उभे राहून एका सुरात, तालात टाळ वाजवतात, भजन करतात. वारकर्‍यांच्या भजनामध्ये सुरापेक्षा भावभक्तीला अधिक महत्त्व आहे. संताचे विविध अभंग आणि त्यावर द़ृष्टांत, गोष्टी सांगत कीर्तन सोहळा हळूहळू पुढे सरकतो. यादरम्यान मधूनच विठ्ठल-रुक्मिणीचा जयघोष करीत केलेले रसाळ भजन वारकर्‍यांना सुखावून जाते.

दिवसभर चालून दमलेला वारकरी विठ्ठलनामाचे भजन करत करतच झोपी जातो आणि पहाटे जागा होतो तो पालखी तळावरील भजनाच्या निनादानेच.

वारकरी अखंड चालत असतात. दमतात, थकतात. मात्र, थांबत नाहीत. त्यांना आनंद, विरंगुळा देणारा क्षण म्हणजे उभे आणि आडवे रिंगण. या खेळात सात्विकता आणि आनंद असतो. माऊली ज्यांवर स्वार असतात असा माऊली अश्व आणि दुसरा शितोळे सरकार यांचा मानाचा अश्व. माऊलींचा अश्व मोकळा असतो व तो पुढे पळत राहतो. त्यामागे स्वार असलेला अश्व धावतो. माऊली अश्व रिंगणात एक-दोन वेढे काढतो, आणि थांबतो. मग, स्वार असलेला अश्व त्यापुढे जातो आणि रिंगण पूर्ण होते. ‘माऊली.. माऊली’चा घोष होताना दोन्ही अश्व माऊलींच्या पालखीजवळ जातात आणि रिंगण संपते. त्यानंतर चोपदार सर्व दिंड्यांना उडीच्या खेळासाठी निमंत्रण देतात. माऊलींच्या पालखीच्या सभोवताली घड्याळाच्या काट्याप्रमाणे ओळी करून टाळकरी उभे राहतात.

बाहेर गोलाकार सर्व मृदंगधारक, विणेकरी आणि झेंडेकरी असतात. टाळ-मृदंगाची जुगलबंदी सुरू होते. चोपदार बंधू चार ठिकाणी उभे राहून सूचना देतात. त्यावर टाळकरी ठेका धरतात. झोपून, गुडघे टेकून, मागे-पुढे तोंड करून टाळकरी बेफाम होऊन नाचतात. अर्धा तास खेळ रंगतो. ‘तुका म्हणे वृद्ध होती तरुण’ अशी परिस्थिती असते. शेवटी चोपदार चोप वर करून उडी मारतात. मग, उडीचे खेळ संपतात. त्यानंतर सर्वजण लोटांगण घालून नमस्कार करतात. यामागे संतांची चरणधूळ शरीराला लागावी, हा उद्देश असतो.

सतीश मोरे

Back to top button