इंदापूर : लाखो नेत्रांनी अनुभवला इंदापूरातील गोल  रिंगण सोहळा  | पुढारी

इंदापूर : लाखो नेत्रांनी अनुभवला इंदापूरातील गोल  रिंगण सोहळा 

इंदापूर : जावेद मुलाणी :

आता कोठे जावे मन तुझे चरण देखलीया,  भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद….. !!

या चरणा प्रमाणेच इंदापूरच्या गोल रिंगणामध्ये वारक-यांचा उत्साह दिसून आला. वारकरी आणि ग्रामस्थांची अलोट गर्दी  एकाच तालात तल्लीन झालेले टाळकरी आणि पखवाज वादक अशा वातावरणात तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण शनिवारी इंदापूर  येथे पार पडले.

नागवेलीच्या पानासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या  निमगांवकरांचा आदरातिथ्य निरोप घेऊन  शनिवारी २ जुलैला पालखी सोहळा इंदापूरकडे मार्गस्थ झाला.त्यानंतर सोनमाथ्यावर सोनाई दुध संघाच्या वतीने सुंगधी दुधासह अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन  गोखळीच्या ओढ्यातील विसावा घेऊन  पालखी सोहळा लाखो  वैष्णव  भक्तासह  इंदापूर येथे दाखल होताच  माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर,प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे ,तहसीलदार श्रीकांत पाटील,नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी रामराजे कापरे,जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा,जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील- ठाकरे, कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, अमोल भिसे, माजी नगरसेवक पोपट शिंदे, कैलास कदम आदी उपस्थित होते. यांच्यासह  आदी मान्यवरांसह इंदापूकरान्नी शाही स्वागत केले.

संत तुकोबांचा पालखी सोहळा रिंगण स्थळ असलेल्या शहरातील  रयत शिक्षण संस्थेचे  कस्तुरा श्रीपती  कदम विद्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर  हर्षवर्धन पाटील यांनी  पालखी रथाचे सारथ्य करत प्रदक्षिणा घालत पालखी  उभारलेल्या चौथऱ्यावर हरिनामाचा जयघोष करित ठेवली.  लाखो वैष्णवांच्या नजरा लागून राहिलेल्या रिंगणास सुरुवात झाली.

रिंगणात प्रथम पताकावाले धावले त्यानंतर  तुळशीवृदावन व हंडा डोक्यावर  घेतलेल्या  महिला धावल्या. विणेकरी,पखवाज वादक यांनी धावा केला.  यांनी प्रदक्षिणा घालत न्यानबा तुकारामच्या नामस्मरणात रिंगणात मोठ्या उत्साहात धावले.  माजी मंत्री पाटील यांच्याहस्ते मानाच्या अश्वाची पुजा झाली वरील प्रदक्षिणा पुर्ण होताच अश्वांचे रिंगण पाहण्यास आतुरलेल्या लाखो नेत्रांनी थोडी उसत मिळताच अश्वांचा  रिंगणात दौड चालु झाली   दोन्ही अश्वानी तीन वेळा वाऱ्याच्या वेगात जोराचा दौड केली.

हा सोहळा  याची डोळा याची देहा  आपल्या नयनात सामावुन ठेवला. व अश्वांच्या टापांची माती कपाळी लावण्यासाठी रिंगणात धावा घेत गर्दी केली व कपाळी माती लावून धन्य धन्य झाल्याची भावना  व्यक्त करत आनंदात फुगड्या ,मानवी मनोरे व टाळमृदंगाच्या गजरात  नाचत भक्तीरसात उन्ह सावली व काही क्षणभर पावसाच्या रिमझिममध्ये आनंद द्विगुणित केला.

हा सोहळा   डोळयात साठवण्यासाठी ग्रामस्थांनी सकाळ पासूनच गर्दी केली होती. मानाचे घोडे रिंगणात उतरल्यानंतर उपस्थितांनी एकच जयघोष केला आणि हरिनामाच्या   गजरान इंदापूर  तुकोबामय झालं. रिंगण सोहळा आटपुन लाखो  वैष्णवासह पालखी सोहळा इंदापूरच्या मुख्य बाजारपेठेतुन इंदापूरकरांचे आदरतिथ स्विकारत नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणात येवुन विसावला.

इंदापूरसह आसपासच्या गावकऱ्यांनी  दर्शनासाठी गर्दी केली होती. तहसीलकार्यालय ,नगरपालिका प्रशासनासह ,पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी चांगली सोय पुरवली तर  उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्यासह पोलिसांनी चोख बदोबस्त ठेवला होता .

Back to top button