Onion Benefits : कांद्याने शरीराला मिळतात ‘हे’ लाभ… | पुढारी

Onion Benefits : कांद्याने शरीराला मिळतात ‘हे’ लाभ...

नवी दिल्ली : कांद्याचा वापर विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. कांदा केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर त्याच्या सेवनाने आरोग्यासाठी अनेक फायदेदेखील होतात. कांदा उष्माघातापासून देखील आपला बचाव करू शकतो.

आहारतज्ज्ञ सांगतात की, कांदा उष्णतेपासून दिलासा देतो. कांद्यामध्ये नैसर्गिक कूलिंग गुणधर्म असतात. यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, जे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतात. यामध्ये सोडियम आणि पोटॅशियमदेखील आढळतात, जे शरीरातील इलेक्ट्रोलाईटस्चे संतुलन राखण्यास मदत करतात. कांद्यात आढळणारे क्वेर्सेटिन आणि सल्फर हे घटक शरीराला थंडावा देतात. कांद्यामध्ये फ्लेव्होनॉईडस्, पॉलिफेनॉल आणि सल्फर संयुगे यांसारखी फायटोकेमिकल्सदेखील आढळतात. हे घटक कांद्याचे अँटिऑक्सिडंट, अँटिइंफ्लेमेटरी, अँटिमायक्रोबियल आणि अँटिकॅन्सर गुणधर्म वाढवतात.

शरीराला सामान्य तापमान राखण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. यामुळे हृदय, फुप्फुस आणि मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव पडतो. कांद्यामध्ये असलेले एलिल सल्फाईडस् रक्तवाहिन्या विस्तारण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि रक्त परिसंचरण सुधारते. कांदा पाचक एंझाईम सक्रिय करून पोटातील गॅस आणि अपचनासारख्या समस्यांपासून बचाव करतो. कांद्यामध्ये भरपूर फायबर आणि प्री-बायोटिक्स असतात. हे आपल्या आतड्यांमध्ये राहणार्‍या चांगल्या जीवाणूंचे पोषण करतात आणि हे जीवाणू पचनासाठी आवश्यक असलेले लहान फॅटी अ‍ॅसिड तयार करतात. कांद्यामध्ये आढळणारे क्रोमियम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्या आहारात कांद्याचा समावेश जरूर करा. कांद्यामुळे लघवी तयार होण्याची प्रक्रिया वाढते. शरीरातील खराब पदार्थ सहज बाहेर काढता येतात. कांद्यामुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढविण्यातदेखील मदत मिळते.

कच्च्या कांद्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंटस्सह पोषक तत्त्वे आढळतात. हे शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. कच्च्या कांद्यामध्ये लिंबाचा रस, पुदिन्याची पाने, मीठ आणि काळी मिरी घालून खाऊ शकता. दह्यासोबत बनवलेला कांद्याचा रायता थंड आणि हायड्रेटिंग आहे. यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.

Back to top button