Shrikhand : उन्हाळ्यात श्रीखंड खाण्याचे अनेक लाभ | पुढारी

Shrikhand : उन्हाळ्यात श्रीखंड खाण्याचे अनेक लाभ

साध्या जेवणालाही शाही मेजवानीचं रूप देणार्‍या श्रीखंडाचे आपल्या आरोग्यालाही अनेक फायदे आहेत. उन्हाळ्यात अनेकदा थंड पदार्थ खायला आवडतात, अशा परिस्थितीत श्रीखंड तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो, असे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे. श्रीखंड स्वादिष्ट असण्यासोबतच शरीरासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. दह्यापासून बनवलेले श्रीखंड उष्णतेपासून आराम देते आणि शरीराला थंडावा देते. एवढेच नाही तर श्रीखंडामुळे पचनक्रिया सुधारते आणि गॅस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. दह्यापासून बनवलेल्या श्रीखंडामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, जे हाडे मजबूत करण्यास खूप मदत करते. श्रीखंडाचे हे काही लाभ…

वजन नियंत्रित करेल :

जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर तुम्ही रोज एक वाटी श्रीखंड सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही श्रीखंड खूप फायदेशीर मानले जाते. हे त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते आणि मुरुम व डाग देखील काढून टाकते.

तणाव कमी होईल :

श्रीखंड खाल्ल्याने मन शांत होते आणि उन्हाळ्यात तणाव कमी होतो. दुपारी घराबाहेर पडल्यास बाजारातून श्रीखंड विकत घेऊन खाऊ शकता. असे केल्याने तीव्र उष्णता टाळता येते. अनेक वेळा प्रखर सूर्यप्रकाशामुळे आपल्याला घाम येतो. त्यामुळे शरीराला चिकटपणा जाणवतो. जर तुम्हाला चिकटपणा टाळायचा असेल तर तुम्ही श्रीखंडाचे सेवन करू शकता. त्यामुळे जास्त घाम येत नाही आणि शरीर थंड राहते.

इम्युनिटी वाढते :

श्रीखंड खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यात आढळणारे गुड बॅक्टेरिया इम्यून सिस्टमला चांगलं ठेवण्यात मदत करतात. सोबतच यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं, जे हाडांच्या मजबुतीसाठी फायद्याचं असतं.

या गोष्टी लक्षात ठेवा :

तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही फळासोबत श्रीखंड खाऊ शकता. याशिवाय तुम्ही नाश्त्यात किंवा स्नॅकच्या वेळीही श्रीखंड खाऊ शकता. काही लोक जेवणानंतरही श्रीखंड खातात. जास्त प्रमाणात श्रीखंड सेवन केल्याने शरीराला हानी पोहोचते, हे लक्षात ठेवा.

Back to top button