उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डास जास्त का चावतात? | पुढारी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डास जास्त का चावतात?

नवी दिल्ली : उन्हाळ्यात एक तर आपण उका ड्याने त्रस्त झालेलो असतो. अंगातून घामाच्या धारा वाहत असतात आणि चैन पडत नसते. अशावेळी रात्री फॅन, कुलर किंवा एसी जरी सुरू असला, तरी अचानक वीज गेल्यावर सगळेच ठप्प होते! या काळात अधिक प्रकर्षाने जाणवतो तो डासांचा ससेमिरा. उन्हाळ्यात डासांचा जरा जास्तच सुळसुळाट होतो आणि त्यांचा त्रास सहन करावा लागतो, हा एक सार्वत्रिक अनुभव आहे. रात्रीची झोप उडवणारे हे डास उन्हाळ्यात इतके कसे बेसुमार वाढतात, असा अनेकांना प्रश्न पडतो. त्यामागेही कारणे आहेत, ती जाणून घेऊया…

उन्हाळ्यात डास जास्त चावण्याचे मुख्य कारण म्हणजे उन्हाळा हा डासांच्या प्रजननाचा काळ असतो. विशेषतः, उन्हाळ्याच्या सुरुवातीला डास प्रजनन करतात. अशावेळी मादी डासांना अंडी घालण्यासाठी रक्ताची गरज असते आणि याच कारणामुळे उन्हाळ्यात डास अधिक चावतात. आपल्याला जे डास चावतात ते नर नसून त्या माद्याच असतात. नर डास हे फुलांचा रस पिऊनच उदरनिर्वाह करतात; मात्र माद्यांना अंडी घालण्यासाठी रक्त प्राशन करावे लागते. त्यामुळे उन्हाळ्यात सायंकाळनंतर या मादी डासांचा उच्छाद सुरू होतो. घाम हे उन्हाळ्यात डास चावण्याचे दुसरे कारण.

उन्हाळ्यात व्यक्तीच्या शरीरातून अधिक घाम निघतो आणि या घामाच्या गंधामुळे डास माणसाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. डासांच्या त्रासाचे तिसरे कारण म्हणजे प्रत्यक्ष उन्हाळाच! या काळात अनेक लोक सायंकाळनंतर खिडक्यांची दारे उघडी सोडतात. त्यामुळे घरात घुसण्यासाठी डासांना वाट मोकळी होते. तसेच या काळात सुती कपडे घातली जातात किंवा कमीत कमी कपड्यांमध्ये माणसाचा वावर असतो. यामुळेही डासांचा त्रास अधिक होत असतो.

Back to top button