Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला कडुनिंब-गूळ का खातात? | पुढारी

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला कडुनिंब-गूळ का खातात?

मुंबई : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याचा सण, नूतन वर्षारंभ. त्यानिमित्ताने दारोदारी रांगोळी, दाराला आंब्याची पानं आणि फुले व अशोकाच्या पानांनी बनवलेल्या तोरणाची तयारी केली जाते. त्यानंतर गुढीचा प्रसाद म्हणून कडुनिंब, गूळ, जिरे यांचे मिश्रण खाण्यासाठी दिले जाते. नववर्षाच्या सुरुवातीला या पाल्याच्या रूपाने कडूच प्रसाद का दिला जातो? याचा विचार तुम्ही कधी केलाय का?

होळीचे दहन झाल्यानंतर वातावरणातील तापमान वाढू लागते. या वातावरणातील बदलामुळे त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी-खोकला आदी आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वातावरणात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला कडुनिंबाचे सेवन केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब आणि गूळ खाण्याची प्रथा जुन्या काळापासूनच चालत आली आहे. कडुनिंब आणि गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत जे शरीराच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी फायदेशीर ठरतात. कडुनिंबाचा पाला हा चवीला कडू असला, तरी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. गुळासोबत कडुनिंबाचा पाला खाल्ल्याने शरीरातील हानिकारक घटक बाहेर काढले जातात.

कडुनिंब खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच वाढत्या उष्णतेपासून कडुनिंबाचा पाला संरक्षण करतो. वाढत्या उष्णतेमुळे त्वचा रोगाचे प्रमाण वाढते. खाज सुटणे, पुरळ येणे यांसारख्या समस्या उन्हाळ्यात डोकं वर काढतात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबची पाने पाण्यात टाकली जातात. ही पाने जंतुनाशक व त्वचेच्या विकारांना अटकाव निर्माण करणारी असतात. शिवाय कडुनिंबाची पाने ही रक्तशुद्धीकरणाचेही काम करते. त्यामुळे वर्षभर निरोगी राहण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला कडुलिंबाची पाने आणि गुळाचे सेवन करण्याची परंपरा आपल्याकडे निर्माण झाली आहे. कडुनिंबातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. उष्णतेमुळे पोटाशी संबंधित विविध आजारांचे प्रमाण वाढते.

कडुनिंब या आजाराला आपल्या शरीरापासून दूर ठेवण्यास खूप मदत करते. तसेच हवामानातील बदलामुळे सांधेदुखी आणि मज्जातंतू दुखणे किंवा सूज यापासून आराम मिळण्यास मदत होते. कडुनिंबाने पोटाची चरबी कमी करण्यात सर्वाधिक मदत होते. कडुनिंब हा केसातील कोंडा, केस गळणे, खाज सुटणे, पुरळ येणे इत्यादीपासून आराम मिळवून देण्यासाठी एक उत्तम आणि प्रभावी पर्याय आहे. बदलत्या वातावरणामध्ये आजारांचा धोका जास्त असताना गूळ खाल्लाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. गुळामुळे पचनक्रिया सुधारते. गूळ खाल्ल्यानंतर असिड रिफ्लक्स होण्याची शक्यता कमी असते. गुळामध्ये खनिजे, कार्बोहायड्रेट्स आणि इतर अनेक पौष्टिक घटक असतात. त्यामुळे गुढीपाडव्याला कडुनिंब व गूळ खाल्ला जातो.

Back to top button