डिजिटल स्क्रीनमुळे मुलांची शिकण्याची गती मंदावली | पुढारी

डिजिटल स्क्रीनमुळे मुलांची शिकण्याची गती मंदावली

कॅनबेरा : मोबाईल फोन, टॅब्लेटसारख्या उपकरणांच्या अतिवापरामुळे कुटुंबातील सुसंवाद दिवसेंदिवस कमी होत चालला आहे आणि याचा सर्वाधिक दुष्परिणाम लहान मुलांमध्ये दिसून येत आहे. डिजिटल स्क्रीनच्या सातत्याने संपर्कात राहत असल्यास अशा छोट्या मुलांना शब्द-स्वर आत्मसात करताना बर्‍याच अडचणींना सामना करावा लागत असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील टेलिथॉन इन्स्टिट्यूटने 220 कुटुंबातील तीन वर्षे व त्याहून कमी वयाच्या मुलांवर हे संशोधन केले आहे.

डिजिटल स्क्रीनमुळे परस्पर संवाद कमी होतो आणि यामुळे मुलांची आकलनशक्तीही कमी होते. जामामध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार सर्व वयोगटातील मुलांना स्क्रीनच्या संपर्कात आल्यास त्याचे तोटे सोसणे भाग असते. संशोधनात असे आढळून आले आहे की, 18 महिन्यांपेक्षा कमी वयाची छोटी मुले डिजिटल उपकरणे अति प्रमाणात वापरतात, त्यावेळी ते 1.3 शब्द कमी आत्मसात करतात. मुले 2 वर्षांची झाल्यानंतर यात आणखी फरक पडतो. याशिवाय सर्वाधिक नकारात्मक परिणाम तीन वर्षांच्या मुलांमध्ये दिसून येतो. 3 वर्षांच्या मुलांनी रोज सरासरी 2 तास 52 मिनिटे स्क्रीन पाहिल्यास ते साडेसहा शब्द कमी आत्मसात करतात, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे.

या संशोधनात वयस्करांकडून उच्चारले जाणारे शब्द, छोट्या मुलांचे शब्द आणि त्यांचा संवाद साधण्याचा प्रयत्न, यावर भर दिला होता. लहानपणी उत्तम संवाद होत असेल तर बौद्धिक पातळीवर याचा मोठा परिणाम होत असतो, यामुळेदेखील डिजिटल स्क्रीनचा अतिवापर टाळत थेट संवाद वाढवण्यावर भर देणे आवश्यक आहे, असे संशोधकांनी शेवटी नमूद केले आहे.

Back to top button