‘गगनयान’पूर्वी व्योममित्रा जाणार अंतराळात! | पुढारी

‘गगनयान’पूर्वी व्योममित्रा जाणार अंतराळात!

बंगळूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ आता एक अत्यंत महत्त्वाची भरारी घेण्यास सज्ज होत आहे. ही भरारी ‘गगनयान’ या मोहिमेची आहे. या मोहिमेत प्रथमच भारतात बनवलेल्या अंतराळयानातून भारतीय अंतराळवीर अंतराळप्रवास करतील. या महत्त्वाकांक्षी मोहिमेपूर्वी महिला रूपातील रोबो अंतराळवीर ‘व्योममित्रा’ अंतराळात उड्डाण करणार आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिल्लीत ही माहिती दिली. यावर्षीच व्योममित्रा ही मानवाकृती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली ही रोबो अंतराळात झेपावणार आहे.

याबाबत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की मानवरहित व्योममित्रा मोहीम यावर्षी जुलै 2024 नंतर नियोजित करण्यात आली आहे. तर गगनयान 2025 मध्ये पाठवले जाणार आहे. ‘व्योममित्रा’ हा शब्द दोन संस्कृत शब्दांपासून बनलेला आहे ‘व्योम’ म्हणजे अवकाश आणि मित्र. जितेंद्र सिंह म्हणाले की ते व्योममित्रा मॉड्यूलच्या पॅरामीटर्सचे निरीक्षण करू शकते, इशारा जारी करू शकते आणि लाईफ सपोर्ट ऑपरेशन करू शकते. हे अंतराळ वातावरणात मानवी क्रियांचे अनुकरण करू शकेल अशाप्रकारे डिझाईन केले गेले आहे. ह्युमनॉईड रोबोट हे मानवाच्या आकारात बनवलेले आणि अनेक अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असे रोबोट असतात. हा रोबो मानवाप्रमाणे फिरू शकतो.

मानवी भाव देखील समजू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रोग्रामिंगद्वारे प्रश्षनांची उत्तरे देखील देऊ शकतात. ह्युमॅनॉइडस्मध्ये दोन विशेष भाग असतात, जे त्यांना मानवाप्रमाणे प्रतिक्रिया आणि हालचाल करण्यास मदत करतात. 1. सेन्सर्स- त्यांच्या मदतीने आपण आजूबाजूचे वातावो. कॅमेरा, स्पीकर आणि मायक्रोफोन केवळ सेन्सरद्वारे नियंत्रित केले जातात. ह्युमनॉईडस् त्यांच्या मदतीने पाहू, बोलू आणि ऐकू शकतात. 2. अ‍ॅक्ट्युएटर- ही एक विशेष प्रकारची मोटर आहे, जी माणसाप्रमाणे चालण्यास आणि हात व पायांची हालचाल करण्यास मदत करते. त्याच्या मदतीने, ह्युमनॉईडस् सामान्य रोबोटच्या तुलनेत विशेष प्रकारच्या क्रिया करू शकतात.

देशाची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम

‘गगनयान’ ही भारताची पहिलीच मानवयुक्त अंतराळ मोहीम असेल. गगनयानचे चाचणी वाहन उड्डाण-‘टीव्हीडी-1’ गेल्यावर्षी 21 ऑक्टोबर रोजी झाले होते. आपत्कालीन परिस्थितीत क्रू एस्केप सिस्टीम आणि पॅराशूट सिस्टीमची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश होता. लाँच वाहन मानवी रेटिंग पूर्ण झाले आहे. सर्व प्रोपल्शन टप्पे योग्यरीत्या कार्यरत आहेत. त्याच्या लाँचिंगची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. गगनयान प्रकल्पांतर्गत अंतराळवीरांची टीम 400 किलोमीटरच्या कक्षेत पाठवली जाईल. त्यानंतर त्यांना समुद्रात उतरवून पृथ्वीवर परत आणण्याची सुरक्षित प्रक्रिया दाखवली जाईल.

रशिया, अमेरिका व चीनने स्वतःचे अंतराळवीर अंतराळात पाठवले आहेत. काही खासगी कंपन्याही याबाबतीत अग्रेसर असून त्यामध्ये रिचर्ड ब्रॅन्सनची कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिक, जेफ बेझोसची कंपनी ब्ल्यू ओरिजिन आणि एलन मस्कची स्पेसएक्स कंपनी समाविष्ट आहे. भारताची गगनयान मोहीम तीन दिवसांची असेल व तिच्यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च येईल. हे यान अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीपासून 300 ते 400 किलोमीटर उंचीवर अंतराळात जाईल.

Back to top button