विशिष्ट प्रसंगी चक्क अल्झायमरचेही होऊ शकते संक्रमण | पुढारी

विशिष्ट प्रसंगी चक्क अल्झायमरचेही होऊ शकते संक्रमण

लंडन : उतारवयात होणार्‍या मेंदूच्या आजारांमध्ये डिमेन्शिया, अल्झायमर यासारख्या काही आजारांचा समावेश आहे. शरीरातील इतर अवयवांच्या पेशी नष्ट झाल्या तर त्यांची जागा नव्या पेशी घेऊ शकतात. मात्र मेंदूतील चेतापेशींचे तसे नसते. एकदा चेतापेशीचा र्‍हास झाला की तो कायमस्वरूपीच असतो. त्यामुळे अल्झायमरसारख्या विस्मरणाशी संबंधित आजारांवर आजपर्यंत रामबाण उपाय सापडलेला नाही. हा आजार विषाणू किंवा जीवाणूंमुळे होणार्‍या संक्रमणशील रोगांपैकी नाही हे तर सर्वांनाच माहिती आहे. मात्र काही विशिष्ट प्रसंगी या आजाराचीही लागण अन्य व्यक्तीस होऊ शकते, असे धक्कादायक संशोधन आता झाले आहे.

या संशोधनानुसार 1959 ते 1985 दरम्यान ब्रिटनमधील काही रुग्णांना अवयवदान करणार्‍या दात्यांच्या शरीरातील पिट्युटरी म्हणजेच मस्तिष्क ग्रंथीमधून निघालेले ह्युमन ग्रोथ हार्मोन देण्यात आले होते. दुर्दैवाने हे हार्मोन दूषित होते आणि त्यामुळे यापैकी काही रुग्णांना कालांतराने अल्झायमर रोग जडला. या संशोधनाचे सहलेखक आणि एमआरसी प्रियन युनिटचे संचालक प्रा. जॉन कोलिंगे यांनी सांगितले की, अल्झायमर हा रोग हवा-पाण्यातून फैलावू शकतो असे आम्ही म्हणत नाही; मात्र अनावधानाने ज्यावेळी मानवी ऊती किंवा हार्मोन्ससह त्याची इतरांना इंजेक्शन दिले जाते, त्यावेळी त्यामध्ये या आजाराचीही बीजे लपलेली असू शकतात.

अर्थात हे अत्यंत दुर्मीळ बाबतीतच घडू शकते. ज्या रुग्णांना दूषित हार्मोन देण्यात आले होते त्यांच्या मेंदूत एमिलॉयड-बीटा नावाचे प्रोटीन साठलेले दिसून आले. हे अल्झायमरचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. अल्झायमर हा रोग म्हणजे ‘प्रोग्रेसिव्ह न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर’ आहे. या आजारामुळे प्रामुख्याने विस्मृतीची समस्या निर्माण होते. हे डिमेन्शियाचे सर्वात सामान्य कारण आहे ज्यामध्ये मेंदूत असामान्य प्रोटीन जमा होत असते. त्याच्यामुळे प्लाक आणि टंगल्सची निर्मिती होते. रोग जसा वाढत जातो तसे विसरभोळेपणा वाढतो आणि दैनंदिन कामे करणेही कठीण होऊन बसते.

Back to top button