Panipuri : आधार कार्ड असेल तरच मिळते ‘ती’ पाणीपुरी! | पुढारी

Panipuri : आधार कार्ड असेल तरच मिळते ‘ती’ पाणीपुरी!

ग्वाल्हेर : आधार कार्ड दिल्याशिवाय एखाद्या ठिकाणी पाणीपुरी Panipuri दिली जात नाही, असे म्हटले तर साहजिकच आश्चर्याने भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. पण, एका ठेल्यावरील परिस्थिती लक्षात घेता अशीच धक्कादायक वस्तुस्थिती समोर येते. एरवी आपण पाणीपुरीच्या ठेल्यावर पैसे देतो आणि पाणीपुरी खातो. मात्र, या ठिकाणी पाणीपुरी खाण्यासाठी चक्क आधार कार्ड दाखवावे लागते. येथे आधार कार्ड दाखवले नाही तर पाणीपुरी दिलीही जात नाही. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आता हा आधार कार्ड घेऊनच पाणीपुरी Panipuri देणारा अनोखा ठेला ग्वाल्हेर शहरातील आहे. मात्र, बर्‍याच ठिकाणी त्याची चर्चा रंगत चालली आहे. पाणीपुरी विक्रेता भगतजी याचमुळे पूर्ण परिसरात बराच प्रसिद्ध आहे. आपली पाणीपुरी भयंकर तिखट असते, असा त्याचा दावा आहे. ही पाणीपुरी खाताच डोळ्यातून पाणी येते. पण, तरीही अशी ही अनोखी पाणीपुरी खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी दिसून येते.

इथल्यापेक्षा अधिक जहाल तिखट असलेली पाणीपुरी Panipuri कुठेही मिळणार नाही, असा या ठेलेवाल्याचा दावा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये देखील असा दावा केला गेला आहे. आपल्याकडे ज्यांनी पाणीपुरी घेतली, त्यांचे वय 18 पेक्षा अधिक असावे आणि त्यासाठी आपण त्यांच्याकडून आधार कार्डची मागणी करतो, असा भगतजींचा दावा आहे. ‘इट थिस आग्रा’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे आणि अर्थातच नेटिझन्सनी त्यावर बर्‍यावाईट प्रतिसादाची अक्षरश: बरसातही केली आहे.

Back to top button