विषारी सुरवंटाला स्पर्श करताच आला हार्टअ‍ॅटॅक | पुढारी

विषारी सुरवंटाला स्पर्श करताच आला हार्टअ‍ॅटॅक

लिस्बन : ट्रिपवर गेलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याला हार्टअ‍ॅटॅक आल्याची घटना समोर आली आहे. या अभिनेत्याने उत्सुकता म्हणून एका विषारी किड्याला हात लावला; पण या किड्याला हात लावणं त्याला चांगलंच महागात पडलं. त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या अभिनेत्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हॉलीवूडचा गाजलेला चित्रपट ‘फिफ्टी शेडस् ऑफ ग्रे’मुळे जगभरात चर्चेत आलेला अभिनेता जेमी डॉर्ननची प्रकृती सध्या गंभीर आहे. जेमी डॉर्ननेचा मित्र गॉर्डन स्मार्टने याबाबत माहिती दिली. स्मार्टने दिलेल्या माहितीनुसार जेमी डॉर्ननने एका किड्याला हात लावला; पण त्यानंतर जेमीच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णलयात दाखल केले. हा ‘किडा’ म्हणजे एक प्रकारचा विषारी सुरवंट होता!

पोर्तुगालच्या गोल्फिंग रिसोर्टमध्ये जेमी डॉर्नन आणि गॉर्डन स्मार्ट हे दोघे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. यावेळी जेमीला अस्वस्थ वाटायला लागले. सुरुवातीला जास्त मद्यपान केल्यामुळे तब्येत बिघडली असेल असे वाटत होते; पण नंतर एका विषारी, केसाळ सुरवंटाला हात लावल्यामुळे जेमीची तब्येत बिघडल्याचा खुलासा झाला.

गॉर्डन स्मार्टने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला जेमीच्या डाव्या हाताला मुंग्या आल्यासारखं वाटू लागलं. त्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे जेमीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर त्याला रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला. पण घरी आल्यावर जेमीचा डावा पाय सुन्न झाला आणि त्यानंतर तो बेशुद्ध पडला. शुद्ध आली तेव्हा जेमी रुग्णालयात होता. उपचारानंतर डॉक्टरांनी जेमी डॉर्ननच्या हार्टअटॅकचे कारण सांगितले. जेमीने एका विषारी केसाळ सुरवंटाला हात लावला होता. त्याचे विष जेमीच्या अंगात भिनलं होतं. परिणामी, जेमीला त्रास झाला आणि त्याला हार्टअ‍ॅटॅक आला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार विषारी सुरवंटामुळे काही श्वानांचा मृत्यू झाला होता. तर काही तरुणांना हार्टअटॅकचा त्रास झाला होता. सुदैवाने जेमी डॉर्ननचा जीव वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

संबंधित बातम्या
Back to top button