उंची वाढवण्यासाठी दीड कोटीची शस्त्रक्रिया! | पुढारी

उंची वाढवण्यासाठी दीड कोटीची शस्त्रक्रिया!

न्यूयॉर्क : शरीरसंपदा केव्हाही महत्त्वाची असते. ही शरीरसंपदा जपावी, हे स्वाभाविकच. पण, काहींचा अट्टाहासदेखील बराच नडत असतो. अमेरिकेतील 29 वर्षांचा तरुण येफरसन कोसिया हादेखील यापैकीच एक. त्याला कमी उंची असल्याची खंत नेहमी जाणवायची. यातून मार्ग काढण्यासाठी त्याने चक्क 1.45 कोटी रुपये मोजत शस्त्रक्रिया करवून घेतली. पण, त्या शस्त्रक्रियेचे दुष्परिणाम आता इतके विकोपास पोहोचले आहेत की, या मार्गाने न गेलेलेच बरे, असा विचार मनाला स्पर्शून गेल्याशिवाय राहणार नाही.

या तरुणाने आपली उंची वाढवण्यासाठी शस्त्रक्रिया करवून घेतली. यासाठी त्याने थोडेथोडके नव्हे तर तब्बल एक कोटी 45 लाख रुपये खर्च केले. या शस्त्रक्रियेनंतर त्याची उंची 5.8 इंचपासून दोन इंचाने वाढली. पण, ज्यासाठी हा सर्व अट्टाहास केला, त्यासाठी सर्व वेदना सोसल्यानंतरही त्याला बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागते आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, कोसियोने आपल्या पायांची लांबी वाढवून घेतली. वेदनादायी सर्जरीनंतर कोसियोची उंची 6 फूट झाली. पण, यामुळे त्याला बर्‍याच वेदना सोसाव्या लागत आहेत. या असह्य वेदनेमुळे तो दोन तासांपेक्षा जास्त झोपू शकत नाही. झोपेच्या गोळ्या घेऊनही काही फायदा नाही. साहजिकच, यातून त्रस्त असलेल्या या युवकाला आता वेदना कमी करण्यासाठी आणखी शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागणार आहे. मांसपेशींना हाड्यांना जोडणार्‍या टिश्यूची शस्त्रक्रिया करवून घेणे त्याला भाग असल्याचे सांगण्यात आले आणि पहिल्या शस्त्रक्रियेचा असा फटका बसल्यानंतर त्याचाही नाईलाजच झाला आहे.

Back to top button