समुद्राबाहेर येणार सोन्याने भरलेल्या जहाजाचे अवशेष | पुढारी

समुद्राबाहेर येणार सोन्याने भरलेल्या जहाजाचे अवशेष

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यात केप फ्लॅटरीच्या तटाजवळ प्रशांत महासागरात एका बुडालेल्या जहाजाचे अवशेष सापडले आहेत. दीडशे वर्षांपूर्वी बुडालेल्या या जहाजात सुमारे 8 दशलक्ष डॉलर्स किमतीचा खजिना असल्याचे सांगितले जाते. आता सोन्याने भरलेल्या या जहाजाचे अवशेष बाहेर काढले जाणार आहेत. हे जहाज सन 1875 मध्ये ब्रिटिश कोलंबियातून अमेरिकेच्या सॅन फ्रन्सिस्कोकडे जात असताना बुडाले होते.

जेफ हम्मेल यांनी या ‘एसएस पॅसिफिक’ नावाच्या जहाजाचे अवशेष शोधले होते. त्यांनी 2002 मध्ये रॉकफिश मोहिमेसह जहाजाच्या अवशेषांवरील अधिकार मिळवले होते. सिएटलच्या एका न्यायालयाने त्यांना हे अधिकार दिले होते. पण, त्याचबरोबर असेही म्हटले होते, की जर कुणी जहाजाच्या मालकाशी आपले कौटुंबिक नाते सिद्ध केले तर त्यांचाही त्यावर मालकी हक्क असू शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये काही लोकांनी तसा दावा केला; पण तो त्यांना सिद्ध करता आला नाही.

जहाजाबरोबर बुडालेल्या सोन्याच्या प्रमाणाबाबतही वेगवेगळे दावे आहेत. रॉकफिश यांनी सांगितले की, आम्ही गेल्या वर्षी जहाजाच्या अवशेषांचे अचूक ठिकाण शोधणे, आपले आरओव्ही विकसित करणे आणि जहाजावरील कलाकृती मिळवण्यासाठी योजना आखणे या गोष्टी केल्या. आता यावर्षी हे अवशेष समुद्राबाहेर काढले जातील. या जहाजाबरोबर 1875 मध्ये तीनशेपेक्षा अधिक लोक बुडाल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये सोन्याच्या खाणीत काम करणारे व घरी परतत असलेले लोक होते.

Back to top button