Forest City : चीनची मलेशियातील ‘फॉरेस्ट सिटी’ ठरली भयावह! | पुढारी

Forest City : चीनची मलेशियातील ‘फॉरेस्ट सिटी’ ठरली भयावह!

क्वालालंपूर : चीनने आपल्याच देशात भल्या मोठ्या इमारती, कॉलनी उभ्या केल्या आहेत, पण त्या इतक्या मोठ्या लोकसंख्येचा देश असूनही निर्जन, ओसाड पडलेल्या आहेत. असाच प्रकार चीनने मलेशियात बनवलेल्या ‘फॉरेस्ट सिटी’ बाबतही घडला आहे. आयटी इंजिनिअर असलेले नाझ्मी हनाफिया वर्षभरापूर्वी फॉरेस्ट सिटीमध्ये राहायला आले होते. ‘मी या ठिकाणाहून बाहेर पडण्यात यशस्वी ठरलो,’ असं नाझ्मी हनाफिया यांनी हसत आणि काहीसं घाबरत सांगितलं.

‘फॉरेस्ट सिटी’ हे दक्षिण मलशिया भागातील जोहोरमध्ये चीननं बांधलेले एक विशाल रहिवासी कॉम्पलेक्स आहे. नाझ्मी यांनी राहण्यासाठी समुद्र किनार्‍यावर वन बेडरूमचा एक फ्लॅट भाड्यानं घेतला होता, पण सहा महिन्यांतच त्यांची तिथं राहण्याची इच्छा संपली होती. त्या ठिकाणाला ते घोस्ट टाऊन म्हणजे ‘भुताचं गाव‘ म्हणत होते. ‘मला जमा केलेल्या डिपॉझिटची किंवा पैशाचीही काही काळजी नव्हती. मला फक्त इथून बाहेर पडायचं होतं. इथं खूप एकटेपणा आहे. फक्त तुम्ही आणि तुमचे विचार असतात,’ असं त्यांनी म्हटलं. चीनमधील मोठ्या विकासकांपैकी एक असलेल्या कंट्री गार्डन नं 100 अब्ज डॉलरच्या फॉरेस्ट सिटी या भव्य प्रकल्पाची सुरुवात केली होती.

बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रकल्पांतर्गत 2016 मध्ये याचं अनावरण केलं होतं. त्यावेळी चीनमधील मालमत्ता व्यवसाय तेजीत होता. त्यावेळी विकासक मध्यम वर्गातील ग्राहकांसाठी देश आणि विदेशात घरांची निर्मिती करण्यासाठी मोठी कर्ज घेत होते. मलेशियामध्ये पर्यावरण पूरक शहराची स्थापन करण्याची कंट्री गार्डनची योजना होती. त्याठिकाणी गोल्फ कोर्स, वॉटर पार्क, ऑफिसेस, बार आणि रेस्तरॉ असतील असं त्यांनी ठरवलं होतं. फॉरेस्ट सिटी हे जवळपास दहा लाख लोकांचं घर असेल, असा दावा कंपनीनं केला होता.

आता आठ वर्षांनंतर हे शहर एखाद्या जुन्या वास्तुच्या अवशेषांसारखं उभं आहे. या संपूर्ण प्रकल्पापैकी फक्त 15 टक्के भागाचं बांधकाम पूर्ण झालं आहे. काही ताज्या अंदाजांनुसार संपूर्ण प्रकल्पापैकी फक्त 1 टक्के भागाचाच ताबा ग्राहकांना देण्यात आलाय किंवा तिथं लोक राहत आहेत. प्रत्यक्षात फॉरेस्ट सिटी हे निर्जन किंवा एकांताच्या ठिकाणी होतं. ते जोहोर बहरू शहरापासून लांब असलेल्या बेटांवर वसवण्यात येत आहे. पण इथून आता भाडेकरूही निघून गेले असून त्याला ‘घोस्ट सिटी’ असं नाव पडलं आहे.

Back to top button