चक्क खार्‍या पाण्याची नदी! | पुढारी

चक्क खार्‍या पाण्याची नदी!

नवी दिल्ली : नद्या या मानवासाठीच नव्हे तर सर्व सृष्टीसाठी जीवनदायिनी असतात. त्यांचे मधुर, शीतल पाणी ‘जीवन’ देत असते. पाण्याला ‘जीवन’ हे समर्पक नाव आहे. नदीचे पाणी हे गोडच असते, असे आपण समजून चालत असतो. मात्र, निसर्ग आपल्याच नियमांना काही अपवादही करीत असतो. चक्क खार्‍या पाण्याची एक नदी आपल्याच देशात आहे. ही नदी समुद्राला जाऊन न मिळता जमिनीतच गायब होते! या नदीचे नाव आहे ‘लुनी’. तिचे मूळ नाव ‘लवणावती’ म्हणजेच ‘मीठ असलेली नदी’ असे आहे.

देशात अनेक नद्या आहेत. काही नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, तर काही बंगालच्या उपसागराला. नद्यांचे पाणी माणसासह सर्व प्राण्यांची तहान भागवत असते. मात्र, आपल्याच देशात ही नदी अशीही आहे जी तहान भागवत नाही. तिचे पाणी पिण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. ही नदी कोणत्याही समुद्राला जाऊन मिळत नाही. राजस्थानच्या उष्ण भागातून वाहणार्‍या या लुनी नदीचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य आहे. ही नदी जास्त खोल नाही.

एखाद्या पावसाळी नदीसारखी ती जमिनीवरून पसरट होत वाहत असते. ज्यावेळी ती रुंदावते त्यावेळी तिचे पाणी लवकरच वाफ होऊन जाते. शिवाय ही नदी राजस्थानच्या अशा भागांमधून वाहते जिथे उष्णता, तापमान अधिक आहे. त्यामुळे ही नदी वाहता वाहताच गायब होते. थरच्या वाळवंटातून निघून ती कच्छच्या रणात येऊन गायब होते. या नदीचे पाणी खारे असल्याने ते पिण्यासाठी वापरता येत नाही. थरच्या वाळवंटातील ही सर्वात मोठी नदी आहे. अरवली पर्वतातील पुष्कर दरीत ती उगम पावते. ती एकूण 495 किलोमीटरचा प्रवास करते.

Back to top button