मंगळावरही जिवंत राहू शकतात उंदीर! | पुढारी

मंगळावरही जिवंत राहू शकतात उंदीर!

वॉशिंग्टनः संशोधकांनी म्हटले आहे की उंदीर चक्क मंगळावरही जिवंत राहू शकतात. चिली आणि अर्जेंटिनाच्या अटाकामा पठारावरील ज्वालामुखींच्या अतिशय शुष्क अशा शिखरांमध्ये खडतर स्थितीतही तग धरून राहणारे काही उंदीर सापडले आहेत. अटाकामा पठार हे पृथ्वीवरील मंगळसद़ृश्य ठिकाण मानले जाते. तेथील वातावरण व तापमान हे मंगळावरील स्थितीशी साधर्म्य दाखवणारे आहे. तिथे हे उंदीर राहू शकत असतील तर ते मंगळावरही राहू शकतील, असे आता संशोधकांना वाटते!

समुद्रसपाटीपासून 6 हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवर सस्तन प्राणी राहू शकणार नाहीत असे संशोधकांना वाटत होते; मात्र अशा ठिकाणीही संशोधकांना आधी उंदरांचे काही सांगाडे आढळले होते. अमेरिकेतील जे स्टोर्ज आणि त्यांचे सहकारी गिर्यारोहक मारियो पेरेज ममानी यांना 2020 च्या प्रारंभी चिली-अर्जेंटिना सीमेवर फैलावलेल्या ‘लुल्लाइकालो’ ज्वालामुखीच्या 22 हजार फूट उंच शिखरावर पानासारखे कान असणारा जिवंत उंदीर असल्याचे पुरावे सापडले होते. यापूर्वी इतक्या उंचीवर सस्तन प्राणी आढळेल याची कल्पनाही करण्यात आली नव्हती. स्टोर्ज यांनी म्हटले आहे की मंगळासारखी स्थिती असणार्‍या या ठिकाणी उंदीर असल्याचे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. संशोधकांनी 21 ज्वालामुखी शिखरांचे निरीक्षण केले. त्यामध्ये 6 हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवर 18 पेक्षाही अधिक ज्वालामुखी होते. अशा ठिकाणी तेरा उंदरांचे सांगाडे आढळले होते. रेडिओकार्बन डेटिंगद्वारे समजले की हे उंदीर काही दशकांपूर्वीचेच आहेत. ते ‘फाइलोटिस वॅकॅरम’ नावाच्या प्रजातीमधील होते.

संबंधित बातम्या
Back to top button