बुध ग्रहाचा बदलत आहे आकार | पुढारी

बुध ग्रहाचा बदलत आहे आकार

लंडन : आपल्या ग्रहमालिकेतील सूर्यापासूनचा सर्वात जवळचा ग्रह म्हणजे बुध. सर्वात लहान आकाराचा ग्रह म्हणूनही बुध ओळखला जात असतो. आता या ग्रहाचा आकार बदलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुध ग्रह आकुंचन पावत असून त्याच्या पृष्ठभागावर मोठमोठ्या आकाराची गोलाकार वर्तुळं पडत असल्याचं दिसत आहे, असे निरीक्षणामधून समोर आले आहे.

एका संशोधनामध्ये हा दावा करण्यात आला आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार बुध ग्रहाची त्रिज्या जवळपास 7 किलोमीटरने कमी झाली आहे. सूर्यापासून सर्वात जवळ असूनही बुध ग्रहाचा गाभा थंड पडत चालला आहे. ज्या डोंगरासारख्या भागापासून बुध ग्रहाचा भाग तयार झाला आहे त्याची घनताही कमी होत आहे. ‘नेचर जिओ सायन्स’ या नियतकालिकेमध्ये हा अहवाल छापण्यात आला आहे. या संशोधन अहवालाचे लेखक ब्रिटनच्या मुक्त विद्यापीठाचे संशोधक बेंजामिन मॅन हे आहेत. बेंजामिन यांनी अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या मॅसेंजर मिशनमधील डेटा वापरून बुध ग्रहाचा सखोल अभ्यास केला आहे. या संशोधकांना बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर काही आकृत्या आणि वर्तुळं दिसून आली आहेत. या वर्तुळांना ‘ग्रेबेस’ असं म्हणतात.

आतापर्यंतच्या संशोधनानुसार बुध ग्रह हा आकुंचित ग्रह आहे. पूर्वी त्याचा आकार अधिक मोठा होता. मात्र, आता आजच्या तारखेलाही बुध ग्रह आकुंचन पावत असल्याची माहिती समोर आली आहे. बेंजामिन यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रेबेस दिसून येणं आमच्यासाठी फार महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. बुध ग्रहाच्या पृष्ठभागाखाली हालचाली फारच सक्रियपणे होत असून त्याचा परिणाम ग्रहाच्या आकारावर होत असल्याचं दिसून येत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बुध ग्रह आकुंचन पावत असल्याचा पहिला पुरावा 1974 साली समोर आला होता.

‘मेरिनर 10’ मोहिमेमधील यानाने अनेक किलोमीटर उंचीवरून काढलेल्या या वर्तुळांचे फोटो दिसले होते. यानंतर ‘नासा’च्या मेसेंजर मोहिमेने 2011 आणि 2015 दरम्यान बुध ग्रहाची परिक्रमा करत त्याचा अभ्यास केला. बुध ग्रहाच्या सर्व पृष्ठभागावर ही वर्तुळं दिसून आली. या अभ्यासामध्ये आढळले की बुध ग्रहाची त्रिज्या जवळपास 7 किलोमीटरने कमी झाली आहे. मात्र, हे का आणि कसं झालं याची माहिती वैज्ञानिकांकडे नाही. वैज्ञानिकही या नवीन माहितीमुळे गोंधळून गेले आहेत. बुध ग्रहावरील सर्वात मोठं वर्तुळ हे 3 अब्ज वर्षे जुने आहे. मात्र, बुध ग्रहावरील सर्व वर्तुळं एवढी जुनी आहेत आणि आताच ती दिसू लागली आहेत का? याचा शोध संशोधक घेत आहेत.

Back to top button