सैबेरियातील बर्फातून बाहेर येत आहेत प्राचीन जीवाणू-विषाणू | पुढारी

सैबेरियातील बर्फातून बाहेर येत आहेत प्राचीन जीवाणू-विषाणू

मॉस्को : जागतिक तापमानवाढीचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम सध्या जगभर पाहायला मिळत आहेत. रशियाच्या सैबेरिया या अतिथंड भागातही असाच एक परिणाम पाहायला मिळू लागला असून तो अतिशय घातकही आहे. या भागात अनेक वर्षांपासून गोठलेली जमीन किंवा बर्फाचा स्तर आहे. त्याला ‘पर्माफ्रॉस्ट’ असे म्हटले जाते. तापमानवाढीमुळे हा पर्माफ्रॉस्टही वितळू लागला असल्याने त्यामध्ये दबलेले व निष्क्रिय असलेले अनेक जीवाणू व विषाणू आता बाहेर पडून सक्रिय होऊ लागले आहेत. त्यामुळे जगाला एखाद्या नव्या महामारीचाही धोका संभवत आहे.

हेलसिंकी युनिव्हर्सिटीमधील इकॉलॉजिकल डेटा सायन्सेसचे प्राध्यापक आणि संशोधक जियोवन्नी स्ट्रोना यांनी सांगितले की पर्माफ्रॉस्टमधून जे सूक्ष्म जीव बाहेर येत आहेत त्यापैकी 1 टक्का सूक्ष्म जीव सध्याच्या इकोसिस्टीमला मोठा धोका निर्माण करू शकतात. या संभाव्य परिणामावर आधारित मॉडेल बनवले जात आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. ‘पर्माफ्रॉस्ट’ म्हणजे बर्फाने बांधले गेलेल्या माती, खडे व वाळूचे मिश्रण.

ध्रुवीय प्रदेशांबरोबरच ते अलास्का, ग्रीनलँड, रशिया, चीन आणि उत्तर व पूर्व युरोपच्या काही भागात पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर किंवा खाली आढळतात. ज्यावेळी असे पर्माफ्रॉस्ट बनतात त्यावेळी त्यामध्ये जीवाणू व विषाणूंसारखे सूक्ष्म जीव त्यामध्ये अडकू शकतात. हे हजारो, लाखो वर्षे तसेच सुप्तावस्थेत जिवंत राहू शकतात. उष्णतेमुळे त्यांच्यामधील चयापचय क्रिया, हालचाली सुरू होतात. त्यामुळे हे निष्क्रिय रोगजंतू पुन्हा सक्रिय होऊन बाहेर येऊ शकतात. यापैकी काही सूक्ष्म जीवांमध्ये अन्य सजीवात रोग निर्माण करण्याचीही क्षमता असते.

2016 मध्ये सैबेरियात अँथ्रेक्समुळे हजारो हरणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक लोकांनाही त्याचा संसर्ग झाला होता. वैज्ञानिकांनी यासाठी पर्माफ्रॉस्टच्या वितळण्याला जबाबदार ठरवले होते. स्ट्रोना यांनी सांगितले की जे सूक्ष्म जीव दीर्घकाळापासून माणूस, प्राणी किंवा जीवाणूंच्या संपर्कातच राहिलेले आहेत त्यांच्यापासून धोका कमी असतो. मात्र, लाखो वर्षांपूर्वीचे सूक्ष्म जीव अचानक समोर आले तर त्यांच्यापासून जोखिम निर्माण होते. संशोधकांनी 1 टक्का सूक्ष्म जीवांना असे ‘ब्लॅक स्वॅन’ ठरवले आहे.

Back to top button