कुणीही जाऊन हिरा शोधू शकतो अशी एकमेव खाण! | पुढारी

कुणीही जाऊन हिरा शोधू शकतो अशी एकमेव खाण!

वॉशिंग्टन : जगभरात अनेक ठिकाणी हिर्‍यांच्या खाणी आहेत. आपल्याकडे मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात अनेक मजुरांना तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही हिरे सापडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. खाणींमधून अनेक कंपन्या हिरे बाहेर काढत असतात. मात्र, त्यासाठी काही नियम व कायदेही असतात. जगात अशीही एक हिर्‍याची खाण आहे जिथे कुणीही जाऊन हिरे शोधू शकतो. इतकेच नव्हे तर याठिकाणी ज्याला हिरा सापडेल त्याच्याच मालकीचा तो होतो! ( Diamonds mine )

ही खाण अमेरिकेच्या अरकान्सास राज्याच्या पाइक कौंटीमधील मरफ्रेसबोरोमध्ये आहे. येथील अरकान्सास नॅशनल पार्कमध्ये 37.5 एकराच्या जमिनीमध्ये हिरे सापडतात. सन 1906 पासून याठिकाणी हिरे सापडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे या ठिकाणाला ‘द क्रेटर ऑफ डायमंडस्’ असे म्हटले जाते. ऑगस्ट 1906 मध्ये जॉन हडलेस्टोन नावाच्या एका व्यक्तीला त्याच्या शेतात दोन चमकते दगड मिळाले होते. त्याने हे दगड तज्ज्ञांना दाखवले असता त्यांनी हे हिरे असल्याचे सांगितले. ( Diamonds mine )

त्यानंतर जॉनने त्याची 243 एकर जमिनी एका हिरे कंपनीला चांगल्या किमतीत विकली. 1972 मध्ये या कंपनीने विकत घेतलेली जमीन नॅशनल पार्कमध्ये गेली. त्यानंतर अरकान्सास डिपार्टमेंट ऑफ पार्क अँड टूरिझमने ही जमीन डायमंड कंपनीकडून खरेदी केली आणि हे ठिकाण सर्वसामान्यांसाठी खुले केले. अर्थात या जमिनीत हिरे शोधण्यासाठी लोकांना नाममात्र शुल्क द्यावे लागते. या शेतामधून लोकांना आतापर्यंत हजारो हिरे मिळालेले आहेत. 1972 पासून आतापर्यंत इथे तीस हजारांपेक्षा अधिक हिरे मिळाले आहेत. ‘अंकल सॅम’ नावाचा हिरा याच ठिकाणी मिळाला होता. हा हिरा 40 कॅरेटचा होता. हा अमेरिकेत मिळालेला सर्वात मोठा हिरा आहे. सामान्यपणे याठिकाणी चार ते पाच कॅरेटचे हिरे अधिक सापडतात.

हेही वाचा : 

 

Back to top button