आंध्रातील खडकांमधून घेतला पृथ्वीच्या इतिहासाचा वेध | पुढारी

आंध्रातील खडकांमधून घेतला पृथ्वीच्या इतिहासाचा वेध

हैदराबाद : सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचे वातावरण ऑक्सिजनयुक्त होऊ लागले होते. त्यावेळी पृथ्वीची स्थिती कशी होती हे पाहण्याची संधी जगातील संशोधकांना आंध्र प्रदेशातील खडकांच्या अभ्यासातून मिळाली. बंगळूरस्थित भारतीय विज्ञान संस्था ‘आयआयएससी’मधील वैज्ञानिकांनी आंध्र प्रदेशच्या कडप्पा जिल्ह्यातील वेम्पल्ले येथे प्राचीन डोलोमाईट (कार्बोनेट) अवशेषांचे अध्ययन केले आहे. त्यामधून काही रंजक माहिती समोर आली.

पृथ्वी नेहमीच जीवसृष्टीला अनुकूल होती असे नाही. वातावरणाच्या खडतर स्थितीमधूनही पृथ्वी गेली होती. एक काळ तर असा होता की ज्यावेळी पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचा स्तर शुक्र ग्रहातील वातावरणाप्रमाणे अत्याधिक होता. अशा वेळी जीवसृष्टीला अनुकूल स्थिती असणे शक्यच नव्हते. अमेरिकेच्या टेनेसी विद्यापीठाच्या संशोधकांच्या साथीने भारतीय संशोधकांनी आंध्र प्रदेशातील खडकांचे अध्ययन केले आहे. अर्थात, पॅलियोप्रोटेरोजोईक युगाच्या जीवाश्मांवरून असे दिसून येते की अशा खडतर स्थितीतही काही प्रमाणात जीवांचे अस्तित्व असू शकते.

त्या काळात प्रकाश संश्लेषण करणार्‍या शैवालांचा उद्भव आणि विकासासाठी कसे उपयुक्त वातावरण प्रदान करण्यात आले हे पाहण्यात आले. या प्राचीन खडकांमध्ये आपल्या ग्रहाचा भूतकाळ दडलेला आहे. संशोधक प्रोसेनजीत घोष यांनी सांगितले की, आपल्या ग्रहाची कहाणी अशा खडकांमध्ये विविध स्तरात दडलेली आहे. समुद्राने वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतले आणि त्यांना कार्बोनेटच्या रूपात डोलोमाईटस्मध्ये साठवून ठेवले. डोलोमाईट हा सागरी पाण्याचा थेट अवक्षेप आहे. ते केवळ सागरी जल रसायन विज्ञानाबाबत नव्हे तर सागरी पाण्याच्या तापमानाबाबतही संकेत देते.

Back to top button