वातावरणाजवळ उपलब्ध आहे स्वत:ला स्वच्छ करण्याचा पर्याय! | पुढारी

वातावरणाजवळ उपलब्ध आहे स्वत:ला स्वच्छ करण्याचा पर्याय!

लंडन : सध्या प्रदूषण ही एक जगासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. माणसामुळेच वातावरणात ग्रीन हाऊस वायूंची भर पडू लागली आहे. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि जलवायू परिवर्तनासंबंधी समस्या वाढू लागल्या आहेत. मात्र, फारच कमी लोकांना माहीत आहे की, वातावरणाजवळ स्वत:चा असा एक अनोखा पर्याय आहे. ज्याच्या मदतीने वातावरण स्वत:ला स्वच्छ करू शकते. मात्र, ही प्रणाली कशी काम करते, याबाबत अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध नाही.

‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातील निष्कर्षानुसार, हवेत निर्माण होणारे पाण्याचे थेंब आणि त्यांच्या आसपासची हवा हे दोन्ही घटक मिळून एक शक्तिशाली विद्युत क्षेत्र अथवा इलेक्ट्रिकल फिल्ड निर्माण करते. यातून ओएच या अणूची निर्मिती होते. हाच अणू मानवनिर्मित प्रदूषके आणि ग्रीन हाऊस वायूला स्वच्छ करण्याचे काम करतो.

संशोधकांच्या मते, ओएच हा अणू प्रदूषकांवर प्रक्रिया करून त्यांना हटवण्याचे काम करतो. खरे तर ओएच आणि हायड्रोकार्बन यांच्यात ऑक्सिरेशन नामक रासायनिक प्रक्रिया होते. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत मिळते. ओएच सर्वप्रथम हवेत तरंगत असलेल्या प्रदूषकांवर प्रक्रिया करून त्यांना तोडण्याचे काम करतो. यामुळे सल्फर डायऑक्साईड आणि नाईट्रिक ऑक्साईड यासारखी हानिकारक रसायने वातावरणात राहू शकत नाहीत. सल्फर डायऑक्साईड आणि नाईट्रिक ऑक्साईड यांना विषारी वायू म्हणून ओळखले जाते.

दरम्यान, मोठमोठे कारखाने व वाहनांंमधून बाहेर पडणार्‍या धुराचे प्रमाण कमी झाल्यास वातावरणातील स्वच्छता प्रक्रियेवर असणारा ताण कमी होईल. याशिवाय वातावरणही स्वच्छ राहण्यास मदत होईल. यासाठी मानवाचे प्रयत्न महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात.

Back to top button