अंतराळ स्थानकावर ब्रिटन करणार दोन प्रयोग | पुढारी

अंतराळ स्थानकावर ब्रिटन करणार दोन प्रयोग

लंडन : ब्रिटनच्या अंतराळ संशोधन संस्थेने पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दोन प्रयोग करण्याची तयारी केली आहे. त्यांचा उद्देश मुलांमधील ब्रेन ट्यूमर आणि स्नायूंचे वय वाढण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्यात सुधारणा करणे हा आहे. ब्रिटिश स्पेस एजन्सीने म्हटले आहे की, 2.6 दशलक्ष पौंडाची ही योजना 2025 मध्ये सुरू केली जाईल.

इन्स्टिट्यूट ऑफ कॅ न्सर रिसर्चचे डी (एमजी) 2 प्रोजेक्टला युके स्पेस एजन्सीने 1.2 दशलक्ष पौंडांचा निधी दिला आहे. डी (एमजी)2 चा उद्देश मिडलाइन ग्लियोमा कसा फैलावतो हे पाहण्याचा आहे. लहान मुलांमधील हा ब्रेन ट्यूमरचा एक प्रकार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असल्याने त्यावर उपचार करणे अत्यंत कठीण होते. स्पेस एजन्सीने युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूलच्या ‘मायक्रोएज-2’ प्रोजेक्टलाही 1.4 दशलक्ष पौंडांचा निधी दिला आहे.

पृथ्वीच्या कक्षेतील मायक्रोग्रॅव्हिटी म्हणजे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाची स्थिती अंतराळवीरांच्या स्नायूंवर कसा परिणाम करते, हे यामधून पाहिले जाईल. या दोन्ही प्रयोगांमधून केवळ ब्रिटनलाच नव्हे, तर पूर्ण मानवजातीला मोठा लाभ मिळेल, असे ब्रिटिश उच्च तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री जॉर्ज फ्रीमन यांनी म्हटले आहे.युके स्पेस एजन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पॉल बेट यांनीही हे दोन्ही प्रयोग मानवजातीला लाभदायक ठरतील, असे म्हटले आहे.

Back to top button