ब्रिटनमधील हिंदू निरोगी, सुशिक्षित! | पुढारी

ब्रिटनमधील हिंदू निरोगी, सुशिक्षित!

लंडन : ब्रिटन आणि एकूणच युरोपमध्ये हिंदू लोक मोठ्या संख्येने आहेत. ब्रिटनमध्ये धार्मिक आधारावर वेळोवेळी काही पाहण्या केल्या जात असतात. आता असे दिसून आले आहे की, ब्रिटनमधील हिंदूधर्मीय सर्वात निरोगी आणि सुशिक्षित धार्मिक समूहांपैकी एक आहेत. इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात अलीकडील जनगणनेमध्ये हे दिसून आले आहे. तसेच स्वत:चे घर असणार्‍यांमध्ये आघाडीवर असलेल्या धार्मिक समूहामध्ये शीखधर्मीयांचा समावेश होत असल्याचेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

ब्रिटनमध्ये मार्च 2021 मध्ये ऑनलाईन जनगणना झाली होती. त्या वेळी देशाच्या लोकसंख्येमधील विविध समूहांसंबंधी माहिती प्रसिद्ध करण्यासाठी जनगणनेच्या आकडेवारीचे विश्लेषण केले जात आहे. या आठवड्यात ब्रिटनच्या जनगणना कार्यालयाकडून विविध धार्मिक समूहांची घर, आरोग्य, रोजगार आणि शिक्षण यासंबंधी माहिती प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये 87.8 टक्के हिंदूधर्मीयांनी ‘अतिशय उत्तम’ किंवा ‘उत्तम’ आरोग्य असल्याचे नमूद केले, राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण 82 टक्के इतके आहे. त्याबरोबरच हिंदूंमध्ये शारीरिक अपंगत्व असल्याचे प्रमाणही सर्वात कमी नोंदवण्यात आले आहे.

ब्रिटनमधील हिंदूंमध्ये शिक्षणाचे प्रमाणही राष्ट्रीय लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. ब्रिटनमध्ये शिक्षणाची सर्वोच्च पातळी ही स्तर 8 इतकी आहे. स्तर 4 आणि त्यापेक्षा वरील पातळीचे शिक्षण (प्रमाणपत्र स्तर) घेणार्‍या हिंदूंचे प्रमाण 54.8 टक्के इतके आहे. राष्ट्रीय पातळीवर हेच प्रमाण 33.8 टक्के इतके आहे.

ब्रिटनमधील शीख समुदायाची गणना सधन गटामध्ये होत असल्याचे या जनगणनेमध्ये दिसून येत आहे. स्वत:चे घर असण्याची शक्यता असलेल्यांमध्ये शीखधर्मीय आघाडीवर आहेत. ब्रिटनमधील 77.7 टक्के शेतकर्‍यांचे स्वत:च्या मालकीचे घर आहे. या जनगणनेत विचारण्यात आलेले धार्मिक प्रश्न ऐच्छिक असतात, 2021 मध्ये झालेल्या जनगणनेत इंग्लंड आणि वेल्समधील 94 टक्के नागरिकांनी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

Back to top button