सूर्यकिरणे ‘शीतल’ बनविण्यासाठी शास्त्रज्ञ सरसावले | पुढारी

सूर्यकिरणे ‘शीतल’ बनविण्यासाठी शास्त्रज्ञ सरसावले

वॉशिंग्टन : सूर्य आपल्या सौरमालेचा राजाआहे. कारण, सूर्य संपावर गेला तर सार्‍या सृष्टीचा विनाश होऊन जाईल. त्यामुळेच आपला दिनक्रम आणि आपले सारे जीवन सूर्याभोवती फिरते, असे म्हटले जाते. सध्या संपूर्ण जगासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली असून, ती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. दिवसेंदिवस सूर्याने आग ओकण्याचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे. त्यामुळेच या जगन्मित्राला काही प्रमाणात शीतल म्हणजेच थंड करण्यासाठी अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा एक गट पुढे सरसावला आहे. मात्र, यातसुद्धा दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. काही शास्त्रज्ञांनी या अभिनव प्रयोगाला विरोध केला आहे. त्यांच्या मते, असे धाडस पृथ्वीसाठी धोकादायक आणि विनाशकारी ठरू शकते.

मीडिया रिपोर्टनुसार, काही शास्त्रज्ञ सूर्यप्रकाश आणि उष्णता घटविण्याच्या प्रकल्पावर काम करत आहेत. सूर्याची उष्णता कमी झाल्यास पृथ्वीवरील ग्लोबल वॉर्मिंगविरुद्धच्या मोहिमेत मोठे यश मिळेल, असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे. मात्र, या प्रकल्पाला विरोध करणार्‍या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, हा प्रकल्प तातडीनं थांबवला नाही, तर येणार्‍या काळात हे पृथ्वीसाठी घातक पाऊल ठरू शकते. महत्त्वाचे म्हणजे, शास्त्रज्ञांच्या दोन गटांमध्ये हा वादा सुरू असतानाही या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे.

ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी काही शास्त्रज्ञांनी एक विचित्र मार्ग शोधला आहे. शास्त्रज्ञ एका यंत्राच्या साहाय्याने सूर्याची पृथ्वीवर येणारी उष्णता आणि सूर्यप्रकाश कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या यंत्रामुळे किमान सूर्यप्रकाश पृथ्वीवर येईल. याबाबत सध्या संशोधन सुरू असून, या प्रकल्पावर आतापर्यंत मोठी गुंतवणूक झाली आहे.

प्रकल्पाबाबत धोक्याचा इशारा

सूर्याची उष्णता कमी करण्याच्या या प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक झाल्याने आता या प्रकरणाच्या चर्चेलाही उधाण आले आहे. सूर्यप्रकाश कमी करण्याच्या या संशोधनाला शास्त्रज्ञांनी ‘सोलर जिओ इंजिनिअरिंग’ असे म्हटले आहे. याबाबतच्या सर्व संभाव्य धोक्यांबाबत काही शास्त्रज्ञांनी इशारा दिल्यानंतरही या प्रकल्पावर काम करणारे शास्त्रज्ञ हा प्रकल्प थांबवण्याच्या विचारात नाहीत. ते आपल्या मतांवर आणि कृतीवर ठाम आहेत.

अशी सुचली कल्पना

जून 1991 मध्ये फिलिपाईन्समधील माऊंट पिनेताबू या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. 20 व्या शतकातील या सर्वात मोठ्या स्फोटातून पसरलेली राख आकाशात सुमारे 28 मैल परिघात पसरली. यानंतर, पुढील 15 महिने संपूर्ण जगाचे तापमान सुमारे 1 अंशाने कमी झाले होते. वातावरणातील राखेमुळे सूर्याची किरणे पूर्णपणे पृथ्वीवर पोहोचू शकत नव्हती. यातूनच शास्त्रज्ञांना नवी कल्पना सुचली. सूर्य आणि वातावरण यांच्यामध्ये एखाद्या गोष्टीचा थर उभा राहिल्यास सूर्याची किरणे पूर्ण शक्तीने पृथ्वीपर्यंत पोहोचणार नाहीत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

दाह कसा कमी होईल?

सोलर जिओ इंजिनिअरिंग म्हणून ओळखल्या जाणार्‍या या प्रक्रियेत शास्त्रज्ञ मोठ्या फुग्यांद्वारे पृथ्वीबाहेरील वातावरणाच्या वरच्या भागावर सल्फर डायऑक्साईडची फवारणी करतील. सूर्यकिरणांना परावर्तित करणारे आगळे गुणधर्म शास्त्रज्ञांना सल्फरमध्ये आढळले आहेत. त्यामुळे सल्फर डायऑक्साईडचा पडदा सूर्यकिरण आणि पृथ्वी यांच्यात उभा केल्यास सूर्याचा दाह कमी होईल, असे शास्त्रज्ञांना वाटते.

नवे तंत्र कसे काम करेल?

या प्रकल्पांतर्गत पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरावर सल्फरची फवारणी केली जाणार आहे. सल्फरचा थर सूर्याच्या किरणांना परावर्तित करून पुन्हा अंतराळात पाठवेल. परिणामी, सूर्यप्रकाश त्याच्या संपूर्ण उष्णतेसह पृथ्वीवर पोहोचू शकणार नाही; मग पृथ्वीवरील वाढत्या तापमानाला आपोआपच लगाम बसेल. या नव्या प्रयोगामुळे ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यास चांगली मदत होईल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. त्यामुळेच त्यांना या प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक मिळाली असून, प्रकल्पाचे काम झपाट्याने सुरू आहे.

Back to top button