दुसर्‍या महायुद्धातील बॉम्बचा ब्रिटनमध्ये स्फोट | पुढारी

दुसर्‍या महायुद्धातील बॉम्बचा ब्रिटनमध्ये स्फोट

लंडन : ब्रिटनमधील ग्रेट यारमाऊथ भागात अवघ्या तीन दिवसांपूर्वी दुसर्‍या महायुद्धातील जिवंत बॉम्ब सापडला. मात्र, डिफ्यूज करताना त्याचा स्फोट झाला. यावेळी झालेला स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा आवाज अनेक मैल अंतरापयर्र्ंत पोहोचला. स्थानिक लोकांनी सांगितले की, ज्यावेळी स्फोट झाला तेेव्हा आपल्या इमारतीसुद्धा थरथरल्या. मात्र, सुदैवाने यामध्ये कसलीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. सध्या या स्फोटाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

यासंदर्भात बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी ग्रेट यारमाऊथ भागात असलेल्या दोन पाईपलाईननजीक दुसर्‍या महायुद्धातील बॉम्ब सापडला. तेथेे नदीनजीक काम करत असलेल्या एका ठेकेदाराला हा बॉम्ब सापडला. त्याने याची माहिती आपत्कालीन सुरक्षा दलाला दिली. सुरक्षा कर्मचार्‍यांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील लोकांना इमारती खाली करण्यास सांगितले.

त्यानंतर दुसर्‍या महायुद्धातील हा बॉम्ब निष्क्रिय करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, काही वेळातच हा बॉम्ब निष्क्रिय न होता त्याचा शक्तिशाली स्फोट झाला. हा स्फोट कॅमेर्‍यात कैद झाला. तोच आता सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
दरम्यान, नॉरफॉल्क पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर करताना सांगितले की, बॉम्ब निष्क्रिय करताना त्याचा स्फोट झाला. आमचे ड्रोन या घटनेचे चित्रीकरण करत होते. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाहीत, याची आम्ही पुष्टी करतो. तसेच सार्वजनिक सुरक्षा आमची जबाबदारी आम्ही योग्यरीत्या पार पाडली.

Back to top button