हाता-पायात का येतात मुंग्या? - पुढारी

हाता-पायात का येतात मुंग्या?

नवी दिल्‍ली : बर्‍याच वेळा आपण हात किंवा पाय न हलवता एकाच ठिकाणी स्तब्ध बसून राहत असतो. अशावेळी आपले हात-पाय बधिर झाल्यासारखे होतात आणि हाता-पायात मुंग्याही येतात. असे का होते याचा अनेकांना प्रश्‍न पडत असतो. वैद्यकीय भाषेत या स्थितीला ‘पॅरेस्थेशिया’ असे म्हटले जाते.

हात-पाय मोकळे केल्यावर काही वेळाने अशी बधिरता जाते व मुंग्यांची समस्याही दूर होते. मात्र, कधी कधी पाय इतके सुन्‍न होतात की त्यांना उचलणे किंवा हलवणेही कठीण होते. आपण ज्यावेळी कोणत्याही हालचालींशिवाय बराच काळ आहे त्याच स्थितीत बसून राहतो किंवा शरीराच्या एखाद्या भागावर वजन टाकतो, त्यावेळी त्या भागाच्या नसा दाबल्या जातात.

त्यावेळी हात किंवा पायांपर्यंत जाणारा ऑक्सिजनचा प्रवाह मंदावतो आणि ते त्या काळासाठी सक्रियपणे काम करणे थांबवतात. अशा परिस्थितीत त्या भागात मुंग्या येणे किंवा बधिरता जाणवणे असे प्रकार घडतात.

शरीराच्या एखाद्या भागात मुंग्या येणे आपल्या मेंदूला सूचित करते. आपण बर्‍याच वेळापासून एखाद्या अवयवाची कोणतीही हालचाल केलेली नाही व त्या भागावर अधिक वजन पडत असल्याचे समजते. त्यानंतर आपण शरीराची हालचाल करतो. हाता-पायात आलेल्या मुंग्या काही वेळाने आपले हात व पाय सामान्य स्थितीत येतात.

Back to top button