Elon Musk : यूजर्सना वाटते मस्क यांनी द्यावा राजीनामा! | पुढारी

Elon Musk : यूजर्सना वाटते मस्क यांनी द्यावा राजीनामा!

वॉशिंग्टन : टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटरचे प्रमुख अ‍ॅलन मस्क (Elon Musk) यांनी आपल्या नव्या ट्विटमध्ये ‘मी ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा देऊ का?’ असा प्रश्न विचारत पोल घेतला. तसेच ट्विटर वापरकर्ते जो कौल देतील त्याप्रमाणे मी निर्णय घेईन, असे म्हटले होते. आता या ट्विटर पोलचा निकाल आला आहे. या पोलमध्ये 1 कोटी 75 लाख यूजर्सनी मतदान केले आहे. यात बहुमत अ‍ॅलन मस्क यांनी राजीनामा द्यावा, यावर आले आहे. हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेक लोक त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

अ‍ॅलन मस्क (Elon Musk) यांच्या ट्विट पोलमध्ये 57.5 टक्के लोकांनी मस्क यांनी ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा द्यावा, यावर मतदान केले. दुसरीकडे, 42.5 यूजर्सनी मस्क यांनी राजीनामा देऊ नये, याला मतदान केले. आता मस्क काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मस्क म्हणाले होते, ‘मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हावे का? मी या ट्विटर पोलच्या निकालाला बांधील असेन.’ या ट्विटवर मस्क यांचे चाहते त्यांनी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होऊ नये, असे सांगत आहेत. दुसरीकडे, मस्क यांच्या निर्णयांवर नाखूश वापरकर्ते या ट्विटर पोलला काहीही अर्थ नाही.

कागदोपत्री कामांसाठी वेगळी व्यक्ती नेमली जाईल आणि मुख्य निर्णय मस्क (Elon Musk) यांच्या म्हणण्याप्रमाणेच होतील, अशी टीका करत आहेत. दरम्यान, अ‍ॅलन मस्क यांनी ट्विटरची कमान हातात घेतल्यापासून मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. एकीकडे कंपनीत कर्मचार्‍यांच्या नोकर कपातीचा प्रश्न ऐरणीवर आहे, तर दुसरीकडे मस्क एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. त्यांनी एक मोठा निर्णय घेत मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवरील 150 कोटी अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : 

Back to top button