FIFA World Cup 2022 : जो जिता वही सिकंदर… | पुढारी

FIFA World Cup 2022 : जो जिता वही सिकंदर...

कतारच्या राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून 2022 च्या फिफा विश्वचषक फुटबॉल (FIFA World Cup) स्पर्धेचा नवीन विश्वविजेता कोण होणार, यावर गेली काही दिवस अनेक अटकळी लावण्यात आल्या. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, वातानुकूलित स्टेडियम आणि अशा बर्‍याच गोष्टींमुळे ही स्पर्धा गाजली. 1986 नंतर अर्जेंटिना पुन्हा विश्वचषक जिंकणार का सलग दुसर्‍या वेळी फ्रान्स विजेतेपद मिळवणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. शेवटची विश्वचषक स्पर्धा खेळत असलेला लियोनल मेस्सी हा सामना जिंकत विश्वचषक उंचावणार का, याकडेही सर्वांचे लक्ष होते. एम्बाप्पे पुन्हा चमकणार का?, गोल्डन बूट कोण मिळवणार? यांसारखे अनेक प्रश्न फुटबॉल रसिकांच्या मनात होते. हे सारे प्रश्न मनात घेऊनच सार्‍या फुटबॉल जगताचे लक्ष लागून राहिलेल्या अंतिम सामन्याचे घमासान अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन बलाढ्य संघांदरम्यान रंगले, पण टायब्रेकरमध्ये अर्जेंटिनाच्या रूपाने 2022 विश्वचषकाचा नवा जगज्जेता मिळाला. हा सामना मेस्सी विरुद्ध एम्बाप्पे असा का होता हे सार्‍या जगाने ‘हाची देही याची डोळा’ अनुभवले. लियोनल मेस्सी बरोबरच एम्बाप्पेसुद्धा या सामन्यात सर्वश्रेष्ठ ठरला.

दोन्ही संघांनी सामन्याची सुरुवात आत्मविश्वासाने केली. दोन्ही संघ आश्वासक दिसत होते. फ्रान्स हाय प्रेसिंग स्ट्रटेजीने खेळताना दिसले, पण त्यांच्या बचावात थोडा विस्कळीतपणा जाणवत होता. याचा फायदा उठवत अर्जेंटिनाने पहिल्या 15 मिनिटांत दोन्ही फ्लांकमधून काही आक्रमणे केली. अर्जेंटिनाने कदाचित डिडीएर डेशचाम्प यांच्या 4-2-3-1 या फॉर्मेशनचा चांगला अभ्यास केला होता. त्यामुळे पहिल्या 20 मिनिटांत फ्रान्सला आक्रमणाच्या संधी मिळाल्या नाहीत. अनुभवी मेस्सी आणि डी मारिया यांच्यातील ताळमेळ अतिशय चांगला होता. मेस्सी आक्रमणात फिडिंगचे काम करत होता. उजव्या फ्लांकमधून सुरुवात करणारा डी मारिया डाव्या बाजूला खेळताना दिसला. त्याच बाजूने अर्जेंटिनाचे आक्रमण सुरू होते. डी मारिया त्याच्या फिटनेसमुळे पूर्णवेळ सामना खेळू शकत नाही. कदाचित यामुळे पहिल्यांदा त्याच्या बाजूने आक्रमण करण्याची रणनीती अर्जेंटाईन प्रशिक्षक लियोनाल स्कॅलोनी यांनी आखली असावी. यात त्यांना यश आलेल. पुन्हा एकदा फ्रान्सच्या बचावात बेशिस्तपणा दिसला आणि 21 व्या मिनिटाला डाव्या फ्लांकमधून केलेल्या आक्रमणात डी मारियाला पाडल्याबद्दल अर्जेंटिनाला पेनल्टी किक मिळाली. (FIFA World Cup)

पुन्हा एकदा अर्जेंटिनाचा तारणहार लियोनल मेस्सीने गोल नोंदवत संघाला या ऐतिहासिक सामन्यात आघाडी मिळवून दिली. फक्त अर्जेंटाईन फॅनच नाही तर सार्या विश्वाचे लक्ष या पेनल्टीकडे होते, पण अतिशय संयमाने आणि शांततेने त्याने बॉलला जाळीत पाठवले. सुरुवातीपासून फ्रान्स दबावात वाटत होते. त्यांच्या चढाईत खोली नव्हती. एम्बाप्पे तर सामन्यात कुठेच दिसत नव्हता. दोन डिफेन्सिव्ह मिडफिल्डर बचावात दिसत होते, पण आक्रमणावेळी त्यांची मदत होत नव्हती. याउलट अर्जेंटिनाच्या 4-3-3 या फॉर्मेशनमधील 3 मिडफिल्डर 3 आक्रमकांना मदत करत फ्रान्सवरील दबाव वाढवत होते. त्याचबरोबर फ्रान्सच्या आक्रमणातील पास कट करत होते. असाच एक पास कट करून मिळालेल्या पझेशनवर 36 व्या मिनिटाला झालेल्या काऊंटर अटॅकवर डी मारियाने डाव्या बाजूने गोल करत अर्जेंटिनाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

दुसर्‍या हाफच्या सुरुवातीला सामन्याची स्थिती वेगळी नव्हती. फक्त फ्रान्सने बॉलचे नियंत्रण स्वत:कडे राखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अर्जेंटिनाच्या बचावफळीने चांगलेच जखडून ठेवले होते. जसा र्‍हिदम अर्जेंटिनाला सापडला होता तसा फ्रान्सला सापडला नाही. फ्रान्सची रणनीती निष्फळ ठरली. प्रशिक्षक डिडीएर डेशचाम्प यांनी एकाच वेळी 3 सबस्टिट्यूट केले. ग्रीझमन, गिरू आणि डेंबेले या आक्रमकांना त्यांनी बदलले. खरे तर हा एक धाडसी निर्णय होता, पण र्ङीलज्ञ ऋर्शींशीी ींहश इीर्रींश या म्हणीप्रमाणे हा धाडसी निर्णय फ्रान्सच्या पथ्यावर पडला. 79 या मिनिटाला एका आक्रमणावेळी अवैधरीत्या अडवल्याबद्दल फ्रान्सला पेनल्टी किक मिळाली. त्यावर स्टार खेळाडू एम्बाप्पेने गोल करत आघाडी कमी केली. 2 मिनिटानंतर लगेचच काऊंटर अटॅकवर उत्कृष्ट गोल नोंदवत एम्बाप्पेने सामना बरोबरीत आणला. सामना पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेत आला. एम्बाप्पे पुन्हा एकदा फ्रान्सचा तारणहार ठरला. बदलामुळे अर्जेंटिनाचे मॅन मार्किंग चुकत होते. याचा फायदा फ्रान्सने करून घेतला. उंचपुर्‍या फ्रान्स खेळाडूंनी एरियल अटॅकवर भर दिला आणि अर्जेंटाईन बचावावर दबाव निर्माण केला. संपूर्ण वेळेत सामना 2-2 अशा बरोबरीत सुटल्याने एक्स्ट्रा टाईममध्ये गेला.

एक्स्ट्रा टाईममध्ये अर्जेंटिनाने सामन्यावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचे काम केले. तर फ्रान्सने अर्जेंटाईन बचावपटूंवर दबाव कायम ठेवण्याचे काम केले. सामन्याचा निकाल एक्स्ट्रा टाईममध्ये लागेल का सामना टायब्रेकरमध्ये जाईल याची उत्कंठा असतानाच मेस्सीने गोल नोंदवत सामना अर्जेंटिनाच्या बाजूने वळवला. पण एम्बाप्पेने 116 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी किकवर गोल करत आपणसुद्धा श्रेष्ठ आहोत हे सिद्ध केले. यानंतर झालेल्या टायब्रेकरमध्ये 4-2 असा विजय मिळवत 1986 नंतर अर्जेंटिनाने आणि लियोनल मेस्सीने त्याच्या कारकिर्दीतील पहिला विश्वचषक उंचावला. मेस्सीचे स्वप्न पूर्ण झाले. दोन पेनल्टी स्ट्रोक अडवत अर्जेंटाईन गोलकिपर इमिलियानो मार्टिनेज सामन्याचा खरा हिरो ठरला.

प्रा. डॉ. श्रीनिवास पाटील

Back to top button