Chandrapur : लग्नात ‘स्विट’ न दिल्याने तुफान हाणामारी; वऱ्हाडी मंडळींना चोप | पुढारी

Chandrapur : लग्नात 'स्विट' न दिल्याने तुफान हाणामारी; वऱ्हाडी मंडळींना चोप

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : लग्न समारंभातील मानवाईक पंगतीक नवरदेवाकडील काही नातेवाईकांना स्विट न मिळाल्याने कॅटरर्स वाल्यांसोबत झालेल्या भांडणात तुफान हाणामारी झाली. यामध्ये काही मद्यप्राशन करून असलेल्या वराकडील व्यक्तींनी कॅटरर्स वाल्यांना मारहाण केली, खुर्च्या फेकून मारल्या. त्यामुळे संतापलेल्या कॅटरर्समधील काही मुलांनी वरांकडील मुलांनी बेदम चोप दिला. दोन्ही मंडळीकडून झालेल्या तुफान हाणामारीत वरांकडील ७ व्यक्तींवर चिमूरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना रविवारी (दि. १८) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मिलन लॉनमध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मिलन लॉनमध्ये वडाळा (पैकु) येथील प्रदिप यशवंतराव जाधव यांच्या मुलीचा विवाह सोहळा वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील वरासोबत आयोजित करण्यात आला होता. या लग्न समारंभाकरिता चिमूर येथील क्वालिटी अन्नपुर्णा कॅटरर्स यांच्याकडे जेवणाची व्यवस्था देण्यात आली होती. विवाह सोहळा पार पडल्यानंतर दुपारी जेवणाला सुरूवात झाली. यामध्ये जेवणात विविध प्रकारचे पदार्थ ठेवण्यात आले होते. वऱ्हाड्यांनी जेवणाचा आनंद घेतल्यानंतर शेवटी मानवाईक पंगत आयोजित करण्यात आली. त्यामध्ये काही वऱ्हाडी हे बाहेर गेले असल्याने ते उशीरा जेवणाकरीता आले. दरम्यान जेवणातील गोड पदार्थ संपलेला होता. त्यामुळे जेवणासाठी बसलेल्या वऱ्हाडी मंडळींनी आम्हाला गोड पदार्थ का दिला नाही, म्हणून त्यांनी कॅटरर्ससोबत भांडण काढले.

जेवायला बसलेल्या वऱ्हाडी मंडळींना स्वीट न वाढल्याने आला राग

जेवणाला उशिर झाल्याने आपणाला जेवण वाढतो परंतु जेवणात स्विट पदार्थ नाही, म्हणून त्यांची समजूत काढली. परंतु मद्यप्राशन करून असलेले वरांकडील काही वऱ्हाडी ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यांनी कॅटरर्स चालविणाऱ्या मुलांना शिवीगाळ व मारहाण करायला सुरूवात केली. समारंभाच्या ठिकाणी असलेल्या खुर्च्या, भांडे कॅटरर्सचालक मुलांना फेकून मारायला सुरूवात केली. बहुतांश खुर्चांची फेकाफेक केल्याने तुटल्या, तर काही कॅटरर्स खुर्च्या व भांडी फेकून मारल्याने किरकोळ जखमी झाले. त्यामुळे कॅटरर्स चालक, कर्मचारी व वऱ्हाडी मंडळीमध्ये तुफान हाणामारीला सुरूवात झाली. आनंदाच्या क्षणाला किरकोळ कारणावरून गालबोट लागले. कॅटरर्स व वऱ्हाडी मंडळी समजण्याच्या मानसिकतेत नसल्याने भांडण वाढत गेले.

कॅटरर्स युवकांनी बाहेरचे लोक बोलावून वऱ्हाडी मंडळीना दिला चोप

वराकडील काही व्यक्तींनी कॅटरर्सच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने त्यातील काही कर्मचारी युवकांनी आपल्या काही परिचित बाहेरच्या लोकांना बोलावून घेतले. या बाहेरुन आलेल्या पन्नास जणांनी वऱ्हाडी मंडळींना चांगलाच चोप दिला. दरम्यान या हाणामारीत सोडविण्याकरीता आलेल्या अन्य मंडळींना देखील चोप बसला. अखेर वराकडील मंडळींनी लॉनचे शटर बंद केले परंतु कॅटरर्समधील युवकांच्या बचावात उतरलेल्या मुलांनी शटर तोडून आतमध्ये प्रवेश करीत चांगलाच चोप दिला. अखेर वाद सोडविण्याकरिता पोलिसांना पाचारण करण्यात आले.

हाणामारीच्या प्रकरणात पोलिसांची एंट्री

रविवारी चिमूर तालुक्यात ग्राम पंचायतीच्या निवडणूका असल्याने पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी होता. त्यामुळे दोन पोलिसांना घटनास्थळी पाठविण्यात आले. दरम्यान लॉनमधील तुफान हाणामारी पाहून पोलिसही घाबरले. पोलिसांना देखील कोणीही ऐकायला तयार नव्हते. दोन्ही कडील मंडळींना समजविण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणीही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे ठाणेदार यांनी दोघांनाही तंबी देत हवेत फायर करण्याकरीता पिस्तूल बाहेर काढले. त्यानंतर मात्र हे प्रकरण थंडावण्यास सुरुवात झाली. या घटनने वरांकडील मंडळी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे ठाणेदार गभने यांनी पोलीस बंदोबस्तात वरासह त्यांच्याकडील सर्व मंडळींना चिमूराबाहेर चार किमी अंतरावर नेऊन सोडले. त्यानंतर या विवाह समारंभातील भांडण थांबले. फिर्यादी गौरव देविदास मोहिनकर (रा. चिमुर) यांच्या तक्रारीवरुन चिमुर पोलिसांमध्ये वर्धा जिल्ह्यातील सेलु येथील एकुण 7 वऱ्हाडी मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button