Bridge Collapses In Bihar : बिहारमध्ये १४ कोटी खर्चून बांधलेला पूल उद्धघाटनापुर्वीच कोसळला | पुढारी

Bridge Collapses In Bihar : बिहारमध्ये १४ कोटी खर्चून बांधलेला पूल उद्धघाटनापुर्वीच कोसळला

पाटना; पुढारी ऑनलाईन : बिहारमधील बेगुसरायमध्ये गंडक नदीवर सुमारे 14 कोटी रुपये खर्चून बांधलेला पूल उद्घाटनापूर्वीच कोसळला. पुलाचा काही भाग तुटून गंडक नदीच्या मधल्या ओढ्यात पडला. या घटनेनंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भ्रष्टाचाराबाबत नितीशकुमार यांच्यावर चौफेर हल्ले होत आहेत. बिहार सरकार सोबतच पूल बांधणाऱ्या एजन्सीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Bridge Collapses In Bihar)

गंडक नदीवरील 206 मीटर लांबीचा पूल मुख्यमंत्री नाबार्ड योजनेंतर्गत बांधण्यात आला. 2012-13 या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या या पुलाचे बांधकाम 23 फेब्रुवारी 2016 रोजी सुरू झाले. हा पूल 22 ऑगस्ट 2017 रोजी 1343.32 लाख रुपये खर्चून पूर्ण झाला. पुलाचे बांधकाम दीड वर्षात पूर्ण झाले. मात्र, अप्रोच रोडचे काम सुरू होते.(Bridge Collapses In Bihar)

माँ भगवती कन्स्ट्रक्शनने केले होते बांधकाम (Bridge Collapses In Bihar)

बेगुसराय जिल्ह्यातील साहेबपूर कमल येथे गंडक नदीवर पूल बांधण्यासाठी बेगुसराय येथील एका बांधकाम कंपनीने निविदा काढली होती. बेगुसरायच्या माँ भगवती कन्स्ट्रक्शनने हा पूल बांधला होता. पुलाच्या पिलर क्रमांक दोन आणि तीनमधील भाग गंडक नदीत पडल्याने माँ भगवती कन्स्ट्रक्शनवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

अवघ्या पाच वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या या पुलाच्या पडझडीनंतर तो बांधून देणाऱ्या संस्थेसह सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. बांधकाम करताना दर्जा पाळला गेला नसल्याचा आरोप लोक करत आहेत. लूटमारीच्या बाबतीत नियम पाळली गेली नाहीत त्यामुळे हा पूल भ्रष्टाचाराला बळी पडला.

उद्घाटनापूर्वीच सुरू झाली वाहतुक

गंडक नदीवर बांधलेल्या या पुलाचे उद्घाटन झाले नसले, तरी वाहतुक सुरू झाली होती. या पुलावरून छोटी वाहने व पादचारी ये-जा करत असत. अप्रोच रोडचे काम पूर्ण न झाल्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक होत नव्हती. या पुलावरील खांब क्रमांक दोन आणि तीनमध्ये पडलेली मोठी भेग पाहून लोकांनी संबंधित विभागाला याची माहिती दिली. पूल खचल्याची व संरक्षक कठड्याला तडा गेल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.

अपघाताच्या दोन दिवस आधी वाहतूक बंद करण्यात आली होती

पूलला तडे गेल्याचे समजताच दोन दिवस आधी पोलीस-प्रशासनाने दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग करून वाहतूक थांबवली. कोणीही पूल ओलांडू नये म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूला वॉचमनही तैनात करण्यात आला होता. प्रशासनाने वेळीच पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला ही कौतुकाची बाब होती. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता घडली असती.

अभियंत्यांनी पाहणी केली होती

पुलाच्या गर्डरला तडा गेल्याची माहिती मिळताच सक्रिय झालेल्या प्रशासनाने अभियंत्यांच्या विशेष पथकाला पाचारण केले. पुलाची तपासणी करून अभियंत्यांचे पथक परतले होते, त्यानंतर वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. पूल कोसळल्याने परिसरातील 20 हजारांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. विशेषत: या पुलाचा उपयोग नदीच्या पलीकडून जनावरांसाठी चारा आणण्यासाठी करणाऱ्या शेतकऱ्यांची अधिकच चिंता वाढली आहे.

मंत्र्यांच्या पुढाकाराने पुलाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली

गंडक नदीवर पूल बांधण्याची मागणी अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक करत होते. परिसरातील जनतेच्या मागणीवरून आमदार परवीन अमानुल्ला यांच्या पुढाकाराने पुलाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. परवीन अमानुल्ला या बिहार सरकारमध्ये समाजकल्याण मंत्रीही होत्या.


अधिक वाचा :

Back to top button