Cosmetic surgery : कोण होतीस तू, काय झालीस तू! | पुढारी

Cosmetic surgery : कोण होतीस तू, काय झालीस तू!

लंडन : ‘सुंदर मी होणार’ म्हणत हल्ली अनेक तरुण-तरुणी कॉस्मेटिक सर्जरी (Cosmetic surgery) करून घेत आहेत. अशा सर्जरींचे तर हल्ली विशेषतः पाश्चात्त्य देशांमध्ये पेवच फुटले आहे. मात्र, चेहर्‍याची थोडीफार ‘डागडुजी’ करून चेहरा ठीक करून घेणे ही बाब वेगळी आणि आहे त्या चेहर्‍याची भलतेच काही तरी करून पुरती वाट लावणे वेगळे! अनेकांनी बाहुली, प्रसिद्ध सेलिब्रिटी यांच्यासारखे दिसण्यासाठी किंवा अगदी विक्रम करण्यासाठीही भलतेसलते प्रकार केलेले आहेत. अशाच एका तरुणीने आपले ओठ विचित्र वाटण्याइतके मोठे करून घेतले आहेत. तिचा आधीचा फोटो व नंतरचा फोटो पाहिला तर ‘कोण होतीस तू, काय झालीस तू?’ असे विचारण्याची वेळे येते!

बल्गेरियात राहणार्‍या या तरुणीचे नाव आंद्रिया इवानोवा असे असून तिचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या महिलेने 2018 सालापासून तिच्या लूकमध्ये बदल करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आजतागायत ही प्रक्रिया सुरू आहे. (Cosmetic surgery) अँड्रियाचे ओठ इतके मोठे झाले आहेत की तिला श्वास घेण्यासही त्रास होत आहे. तिचा हा लूक पाहून अनेक जण भीती व्यक्त करत आहेत. एंड्रियाच्या इन्स्टाग्रामवर उपलब्ध माहितीनुसार, तिला 2018 मध्ये लिप फिलर केले जाऊ लागले. आतापर्यंत तिने ही प्रक्रिया 32 वेळा केली आहे. तिने हायलुरोसिक अ‍ॅसिड फिलर्ससाठी सुमारे 8,000 पौंड खर्च केले आहेत.

भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 7.59 लाख रुपये आहे. तसे, अँड्रिया असेही म्हणते की आता ती स्वतःही गॅरंटी देऊन सांगू शकत नाही की तिने एकूण किती पैसे खर्च केले आहेत; पण एवढं करूनदेखील माझे ओठ पहिल्यासारखे होतील हे सांगता येत नाही. हे अ‍ॅसिड शरीरात नैसर्गिकरीत्या असते. यामुळे त्वचा आर्द्रतायुक्त आणि टणक ठेवण्यास मदत करते. मागच्या काही वर्षांत अ‍ॅसिडचे कृत्रिम रूप वेगवेगळ्या कॉस्मेटिक उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले आहे. हे वृद्धत्वाच्या चिन्हे घालवण्यासाठी आणि ‘फिलर’ म्हणून वापरले जाते. अँड्रियाने तिच्या ओठांमध्ये हे अ‍ॅसिड भरले होते, (Cosmetic surgery)ज्यामुळे तिचे ओठ मोठे झाले. या अ‍ॅसिडमुळे अनेक दुष्परिणामही होऊ शकतात.

Back to top button