तब्बल 31 किलो वजनाचा गोल्ड फिश | पुढारी

तब्बल 31 किलो वजनाचा गोल्ड फिश

लंडन ः आपण घरातील अ‍ॅक्वॅरियममध्ये किंवा काचेच्या हंडीत सोडलेले गोल्ड फिश पाहत असतो. हे सोनेरी, नारंगी रंगाचे सुंदर गोल्ड फिश आपले लक्ष वेधून घेत असतात. मात्र, हे गोल्ड फिश किती मोठे होऊ शकतात याची आपण कल्पनाही करीत नाही. आता जगातील सर्वात मोठ्या गोल्ड फिशपैकी एक समजला जाणारा 31 किलोंचा मासा एका मच्छीमाराला मासेमारी करताना पाण्यात सापडला. बि—टनमध्ये राहणार्‍या एका मच्छीमाराने हा गोल्डफिश शर्थीचे प्रयत्न करुन पाण्यात शोधला. जवळपास 20 वर्षांपूर्वी हा गोल्ड फिश पाण्यात सोडण्यात आला होता.

गोल्ड फिश समुद्रात किंवा तलावाच्या पाण्यात क्वचितच आढळतो. एका मच्छीमाराने नारंगी रंगाचा गोल्ड फिश पकडला. 20 वर्षांपूर्वी या माशाला पाण्यात सोडण्यात आले होते. त्यानंतर हा मासा पाण्यात क्वचितच दिसायचा. एका फिशरी मॅनेजरने सांगितले की, या गोल्ड फिशचे आरोग्य आजही ठणठणीत आहे. हा मासा जगातील सर्वात मोठ्या गोल्ड फिशपैकी एक आहे, असा दावा केला जात आहे. या माशाला पकडण्यासाठी एंडी हैकेटने जवळपास 25मिनिटं पाण्यात शोध घेतला. ‘कॅरट’ नावाच्या या गोल्ड फिशला पकडल्यानंतर पुन्हा त्याला पाण्यात सोडण्यात आले.

हायब्रिड प्रजातीचा हा मासा खूप आकर्षक आहे. ‘कॅरट’ला 20 वर्षांपूर्वी जेसन काउलरने पाण्यात सोडले होते. 2019 मध्ये जेसन फुगेटने अमेरिकेच्या मिनोस्टामध्ये असाच एक मासा पकडला होता; पण त्याचं वजन 18 किलो होतं. एंडीने म्हटलं की, मला या गोल्ड फिशबाबत माहिती होती की, हा मासा फ्रान्समध्ये ब्लूवॉटर लेक्समध्ये उपलब्ध आहे; पण मी या गोल्ड फिशला पकडेन, असे मला कधी वाटले नव्हते. दरम्यान, एंडीने हा मासा पकडल्यानंतर त्याच्यासोबत फोटोही काढले आणि त्यानंतर त्याने या माशाला सुरक्षितपणे पाण्यात सोडले.

Back to top button