गोल फिरत राहणार्‍या मेंढ्यांचे गूढ! | पुढारी

गोल फिरत राहणार्‍या मेंढ्यांचे गूढ!

बीजिंग : चीनमध्ये मेंढ्यांच्या कळपातील काही मेंढ्या अचानक गोल गोल फिरू लागल्या. त्यांच्या या विचित्र वर्तनामुळे मालक तर थक्क झालाच, शिवाय या व्हिडीओमुळे जगभरातील लोकही थक्क झाले. मेंढ्या अशा गोल का फिरू लागल्या याबाबत वेगवेगळे कयास व्यक्त केले जाऊ लागले.

आपल्याला माहिती आहेच की मेंढ्या एकामागोमाग एक चालतात. म्हणजे मागील मेंढी आपल्या पुढील मेंढीला ‘फॉलो’ करते. तिच्याच पावलांवर पाऊल टाकते. अशा पद्धतीने मेंढ्यांचा कळप एका रांगेत चालताना दिसेल; पण या व्हिडीओत मात्र मेंढ्या गोलगोल फिरत आहेत. एकाच वर्तुळात त्या फिरताना दिसत आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सीसीटीव्ही फुटेजमध्ये मेंढ्या गोलाकार फिरताना दिसत आहेत. मोठं वर्तुळ त्यांनी केलं आहे आणि याच वर्तुळाभोवती त्या फिरत आहेत. काही मेंढ्या त्यांच्या आजूबाजूला उभ्या आहेत. तर याच व्हिडीओच्या पुढील व्हिडीओत जो एका कॅमेर्‍यात शूट करण्यात आला आहे. त्यामध्ये काही मेंढ्या त्या वर्तुळाच्या आतही दिसत आहेत. माहितीनुसार या मेंढ्या काही खात-पीतही नाही आहेत; पण तरी त्या ठणठणीत आहेत.

‘पीपल्स डेली चाइना’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार उत्तर चीनच्या मंगोलियातील ही घटना आहे. शेकडो मेंढ्या दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस एका वर्तुळात गोलगोल फिरत आहे. मेंढ्या तशा निरोगी आहेत; पण त्यांच्या या विचित्र वागण्याचं रहस्य बनलं. मीडिया रिपोर्टनुसार मेंढ्यांचा मालकही हैराण झाला. त्याने सांगितलं की सुरुवातीला काही मेंढ्या असं करत होत्या; पण आता संपूर्ण कळप असा करू लागला आहे. त्यांच्या या वागणुकीचं कारण त्यांनाही माहिती नाही. तज्ज्ञांच्या मते, ‘लिस्टेरियोसिस’ नावाच्या एका जीवाणूजन्य आजारामुळे प्राण्यांचा व्यवहार असा होतो. या आजाराचा त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. मेंदूला सूज येते आणि मग भटकल्यासारखं वाटतं, शरीरारला लकवाही मारू शकतो.

इंग्लंडच्या ग्लूसेस्टरमधील हार्टपुरी युनिव्हर्सिटीच्या कृषी विभागातील प्राध्यापक मॅट बेल यांनी मेंढ्यांच्या या विचित्र वागण्याचं नेमकं कारण सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, असं वाटतं की या मेंढ्या बर्‍याच कालावधीपासून या कुंपणाच्या आत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये ‘स्टिरियोटाइपिक’ झाला आहे. म्हणजे एकाच आणि मर्यादित ठिकाणी राहिल्याने मेंढ्या निराश झाल्या आहेत आणि त्या गोलगोल चक्कर मारत आहेत. त्यानंतर काही मेंढ्यांना पाहून इतर मेंढ्याही त्यांच्याप्रमाणे वागू लागल्या.

Back to top button