जगातील प्रत्येक पाचव्या मुलात दिसतात चिंतेची लक्षणे | पुढारी

जगातील प्रत्येक पाचव्या मुलात दिसतात चिंतेची लक्षणे

न्यूयॉर्क : अमेरिकेतील ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’च्या 2021 च्या अहवालातील निष्कर्षानुसार जगभरातील प्रत्येक पाचव्या मुलामध्ये ‘एंग्झाईटी’चे म्हणजे चिंतेची लक्षणे दिसून येत आहेत. चिंतेची बाब म्हणजे मूल एंग्झाईटीने त्रस्त असले, तरी त्याचे कुटुंबीय यास हलकेपणाने घेत आहे, जे नुकसानदायक ठरू शकते आणि भविष्यात मुलांना मानसिक आजाराच्या समस्यांना तोंड देण्याची वेळ येऊ शकते. अशी मुले लोकांशी भेटणे अथवा मित्रांमध्ये मिसळण्यापासून दूर राहत असतात.

एंग्झाईटीने त्रस्त असलेल्या मुलांमध्ये गर्दीच्या ठिकाणी जावयाचे असल्यास त्यांच्याकडून पोटात दुखणे, वारंवार लघवीला होणे, डोकेदुखी अशा तक्रारी पाहावयास मिळतात. न्यूयॉर्कमधील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट रेचल ब्रुसमेन यांच्या माहितीनुसार एंग्झाईटीची लक्षणे शक्य तितक्या लवकर ओळखल्यास मुलांना या आजारांपासून दूर ठेवण्यास मदत मिळते. दरम्यान, यूकेच्या ‘हेल्थ सर्व्हिस’च्या माहितीनुसार मुलांना एंग्झाईटीबद्दल काहीच माहीत नसते अथवा त्यांना सांगण्याचा दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नसतो.

मात्र, त्यांच्यात यामुळे एकाग्रतेचा अभाव, अंथरुण ओले करणे, झोपेत समस्या येणे, जेवणादरम्यान किरकिर करणे, पालकांना नेहमी चिकटून राहणे, आपली दैनंदिन कामेही टाळणे, अकारण घाबरणे अशा समस्या दिसून येतात. पालकांनी ही लक्षणे पाहून त्वरित तज्ञ डॉक्टरांकरवी उपचार घेतल्यास मुलांचा एंग्झाईटीपासून बचाव करण्यात यश मिळते.

Back to top button