अंतराळवीरांना हृदयविकार, कॅन्सरचा असतो धोका | पुढारी

अंतराळवीरांना हृदयविकार, कॅन्सरचा असतो धोका

कॅलिफोर्निया : भविष्यात अंतराळयात्रांची संख्या आणि अवधी वाढण्याची शक्यता गृहीत धरून नुकतेच एक नवे संशोधन करण्यात आले. यातील निष्कर्षानुसार अंतराळ प्रवास केल्याने अंतराळ प्रवाशांना हृदयासंबंधीचा व कॅन्सरचा आजार होण्याची शक्यता बळावते. 20 वर्षांपूर्वी अंतराळाचा 12 दिवसांचा प्रवास करून परतलेल्या यात्रींच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला.

अंतराळ प्रवाशांच्या रक्ताचा अभ्यास केला असता त्यामध्ये कायिक उत्परिवर्तन (डेारींळल र्चीींरींळेपी) होते, असे स्पष्ट झाले. यामुळे वरील आजारांचा धोका बळावतो, असे आढळून आले. यामुळे जे लोक अंतराळाचा प्रवास करतात, त्यांनी संपूर्ण आयुष्यभर आपल्या आरोग्यावर लक्ष ठेऊन नियमित चाचण्या करवून घेण्याची गरज असल्याचे संशोधकांचे मत आहे.

माऊंट सिनाई येथील ‘कान स्कूल ऑफ मेडिसिन’च्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. 1998 ते 2001 दरम्यान ‘स्पेस शटल’ मोहिमेंतर्गत अंतराळ प्रवासावर गेलेल्या 14 प्रवाशांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांचे विश्लेषण केले असता रक्त तयार करणारे तंत्र म्हणजे ‘हिमोटोपोएंटिक स्टेम सेल्स’च्या डीएनएमध्ये बदल अथवा कायिक उत्परिवर्तन झाल्याचे आढळून आले. हे महत्त्वपूर्ण संशोधन ‘करंट बायोलॉजी’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असून ते भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते.

Back to top button