नाकातली रिंग सापडली फुफ्फुसात! | पुढारी

नाकातली रिंग सापडली फुफ्फुसात!

न्यूयॉर्क : कधी कधी भलतेच अनपेक्षित प्रकार घडत असतात. एका तरुणाने नाकात हौसेने (!) एक रिंग घातली होती. ही रिंग पाच वर्षांपूर्वी अचानक गायब झाली होती. आता ही रिंग त्याच्या फुफ्फुसात असल्याचे आढळून आले आहे!

अमेरिकेतील सिनसिनाटी येथे राहणार्‍या जॉय लायकिन्स नावाच्या 35 वर्षांच्या तरुणाला पियर्सिंग म्हणजेच शरीरावर छिद्रे पाडून तिथे दागिने घालण्याची हौस आहे. त्याने नाकही टोचून तिथे ही रिंग घातली होती. पाच वर्षांपूर्वी अचानक ती कुठे तरी हरवली. काही आठवड्यांपूर्वी त्याला मध्यरात्री खोकल्याचा त्रास झाला आणि आपला श्वास कोंडला जात असल्याचे त्याला जाणवले. त्यावेळी त्याला छातीत वेदनाही होत होत्या.

डॉक्टरांनी त्याच्या छातीचा एक्स-रे काढल्यावर ते चकीतच झाले. त्याच्या फुफ्फुसात एक रिंग अडकल्याचे त्यामधून दिसून आले. एक्स-रे पाहिल्यावर जॉयला आपली पाच वर्षांपूर्वी हरवलेली रिंग आठवली. रात्रीच्या वेळी तो झोपला असताना ही रिंग त्याच्या नाकातून श्वसनमार्गात व तेथून फुफ्फुसात गेली होती.

सकाळी उठल्यावर त्याने या रिंगचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला; पण ती सापडली नव्हती. सुमारे चार वर्षे वापरलेली रिंग हरवल्याने तो दुःखी झाला होता. आता ही रिंग त्याच्याच डाव्या फुफ्फुसात होती असे दिसून आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या फुफ्फुसातील ही रिंग बाहेर काढली.

Back to top button