सर्वात मोठ्या गालांची महिला! | पुढारी

सर्वात मोठ्या गालांची महिला!

लंडन ः शस्त्रक्रियांचा मार्ग अवलंबून अनेक स्त्री-पुरुष आपल्या चेहर्‍यात भलतेसलते बदल घडवून आणत असतात. बार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करवून घेणार्‍या तर अनेक तरुणी जगाच्या पाठीवर आहेत. एक मॉडेल तर अशी आहे जिने शस्त्रक्रिया करून आपले गाल उंच व मोठे करवून घेतले आहेत. या महिलेचे गाल हे आता जगातील सर्वात मोठे ठरले आहेत, अर्थात कृत्रिम मार्गाने!
ही मॉडेल युक्रेनची असून तिचे नाव अ‍ॅनास्तासिया पोक्रेश्चूक असे आहे. 33 वर्षांच्या या मॉडेलने आतापर्यंत चेहर्‍यावर अनेक वेळा प्लास्टिक सर्जरी करवून घेतल्या आहेत.

सहा वर्षांपूर्वीच्या तिच्या फोटोमधील व आताच्या फोटोमधील फरक सहज दिसून येतो. तिचे हे फोटो सोशल मीडियात येताच अनेक यूजर्सनी कमेंटस्चा पाऊसच पाडला! तिने आपला सहा वर्षांपूर्वीचा फोटो स्वतःच इन्स्टाग्रामवरून शेअर केला होता. हा फोटो तिने जिममध्ये वर्कआऊट करीत असताना टिपला होता. आता तिने आपले गाल आणि ओठ भलतेच मोठे करवून घेतले आहेत. त्यामुळे तिचे सौंदर्य किती वाढले हे ज्याचे त्याने ठरवावे! मात्र ती स्वतः या बदलामुळे खूश आहे. विशेष म्हणजे अनेक यूजर्सनीही ती आता अधिक सुंदर दिसते असे म्हटले आहे. अर्थातच काही स्पष्टवक्त्यांनी तू आधी खूपच सुंदर होतीस, आपला चेहरा पूर्ववत करा असा सल्लाही दिला!

Back to top button