मेक्सिको मध्ये सापडला दोन हजार वर्षांपूर्वीचा फुलांचा गुच्छ! | पुढारी

मेक्सिको मध्ये सापडला दोन हजार वर्षांपूर्वीचा फुलांचा गुच्छ!

मेक्सिको सिटी ः मेक्सिको मध्ये पुरातत्त्व संशोधकांनी तब्बल दोन हजार वर्षांपूर्वी देवतेला अर्पण केलेल्या फुलांच्या गुच्छाचे अवशेष शोधले आहेत. प्राचीन तिओतीहुआकानच्या लोकांनी सुंदर फुलांचा एक मोठा गुच्छ अर्पण केला होता. सध्याच्या मेक्सिको सिटीजवळ त्या काळातील प्राचीन नगर होते व तिथे असलेल्या एका पिरॅमिडखाली उत्खननात हा आश्‍चर्यकारकरीत्या चांगल्या स्थितीत राहिलेला गुच्छ आढळला.

हा पिरॅमिडही अतिशय विशेष असाच आहे. त्याची उंची 75 फूट असून तो ज्यावेळी पहिल्यांदा बांधण्यात आला त्यावेळी तो इजिप्‍तमधील गिझा येथील स्फिंक्सच्या पुतळ्यापेक्षाही उंच असावा असे संशोधकांना वाटते. पंख असलेल्या सर्पाच्या मंदिराचा हा पिरॅमिड एक भाग आहे. ‘क्‍वेत्झाल्कोटल’ या सर्पदेवतेच्या पूजेसाठी मेसोअमेरिकेतील हे मंदिर उभे करण्यात आले होते. त्याचाच एक भाग असलेले हे तिओतिहुआकान पिरॅमिड आहे.

पिरॅमिडखाली असलेल्या भुयाराच्या सर्वात खोल भागात म्हणजेच 59 फूट खोलीवर हा पुष्पगुच्छ सापडला. मेक्सिकोच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अँथ—ोपोलॉजी अँड हिस्टरीचे सर्जिओ गोमेझ-चावेझ यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांच्या नेतृत्वाखालीच हे उत्खनन करण्यात आले. अशी फुले अर्पण करणे हा त्या काळातील विधींचा एक भाग असावा असे त्यांनी सांगितले.

Back to top button