युरोपियन अंतराळ संस्था शुक्रावर पाठविणार यान | पुढारी

युरोपियन अंतराळ संस्था शुक्रावर पाठविणार यान

लंडन : आपल्या सूर्यमालेतील असंख्य रहस्यांपैकी एक रहस्य म्हणजे शुक्र ग्रह. अब्जावधी वर्षांपूर्वी ‘पृथ्वी’ आणि ‘शुक्र’ हे दोन्ही ग्रह एकसारखेच होते; मात्र पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आले; पण शुक्रावर नरकासारखी स्थिती निर्माण का झाली, याचा अभ्यास खगोलशास्त्र गेल्या दीर्घकाळापासून करत आहेत. यामुळेच मंगळानंतर दुसर्‍या ग्रहाचा अभ्यास करावयाची वेळ आली तेव्हा ‘नासा’ने शुक्राची निवड केली. आता याच ग्रहाच्या अभ्यासासाठी युरोपियन अंतराळ संस्थेने ‘एनविजन’ नामक मोहीम पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

पृथ्वीच्या शेजारी असलेल्या शुक्र या ग्रहावर एक नवी मोहीम पाठविण्याची तयारी करत असल्याचे युरोपियन अंतराळ संस्थेने नुकतेच जाहीर केले. या मोहिमेच्या माध्यमातून शुक्राची एखाद्या नरकासारखी का स्थिती बनली आहे, याची पडताळणी केली जाणार आहे. या मोहिमेला ‘एनविजन’ असे नाव देण्यात आले असून 2030 च्या दशकाच्या सुरुवातीला ही मोहीम लाँच केली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान शुक्राचे कोअर आणि त्याच्या वातावरणाचा प्रामुख्याने अभ्यास केला जाणार आहे.

‘एनविजन’ मोहिमेतून शुक्राच्या विकासाबाबतची माहिती मिळविली जाणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते, शुक्राचा आकार, संरचना आणि सूर्यापासूनचे अंतर हे पृथ्वीसारखेच आहे; मात्र नव्या सिद्धांतानुसार या ग्रहाचा विकास वेगळ्या पद्धतीने झाल्याने तेथील स्थिती जीवनास योग्य नाही.

Back to top button