आकाशातून पहा 4 हजार वर्षांपूर्वीचे शहर | पुढारी

आकाशातून पहा 4 हजार वर्षांपूर्वीचे शहर

कैरो :  इजिप्तमध्ये हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या अनेक खुणा आजही पाहायला मिळतात. ही प्राचीन संस्कृती कधीच लयाला गेलेली असली तरी त्या काळातील पिरॅमिड, मकबरे व प्राचीन शहरांचे अवशेष अद्याप पाहायला मिळतात. त्यामध्येच लक्सरमधील चार हजार वर्षांपूर्वीच्या शहराचा समावेश आहे.

या शहराचे आता आकाशातून दर्शन घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. पर्यटक पॅराग्लायडिंग व हॉट एअर बलून राईडच्या सहाय्याने या शहराचे विहंगम (म्हणजे आकाशात उडणार्‍या पक्ष्याच्या नजरेतील) द़ृश्य पाहू शकतात.

सध्या हे शहर पर्यटकांनी फुलून गेले आहे. हॉट एअर बलून राईडचा आनंद अनेक लोक घेत आहेत. मात्र, रविवारी हवेचा वेग वाढल्याने आणि दिशा बदलल्याने एका बलूनचा अपघात झाला होता. त्यावेळी हा बलून 197 फूट उंचीवर होता. अपघातात एक पर्यटक जखमी झाला. त्यानंतर बलून रायडिंगवर बंदी घालण्यात आली. सुरक्षा व्यवस्थेची पुन्हा एकदा समीक्षा केल्यानंतर बुधवारी हॉट एअर बलून राईड पुन्हा सुरू करण्यात आली. आता एका दिवसात 28 पर्यटकांनाच हॉट एअर बलूनची राईड घडवून आणली जात आहे. लक्सर शहर हे राजधानी कैरोपासून 510 किलोमीटरवर आहे. पर्यटक बलूनमधून तेथील प्राचीन शहरातील मंदिराचे अवशेष आकाशातून पाहू शकतात.

Back to top button