‘जेम्स वेब’ने टिपली चमकदार नेब्युलाची प्रतिमा | पुढारी

‘जेम्स वेब’ने टिपली चमकदार नेब्युलाची प्रतिमा

वॉशिंग्टन :  अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या जेम्स वेब टेलिस्कोपने आपल्या कामाचा धडाका सुरू केलेला आहे. या टेलिस्कोपने टिपलेले ब्रह्मांडाचे पहिले रंगीत छायाचित्र 12 जुलैला प्रसिद्ध करण्यात आले होते. आता त्यानंतर आणखी चार छायाचित्रे जगासमोर आली आहेत. त्यापैकी एक छायाचित्र रिंग नेब्युलाचे आहे. त्याच्या वरील बाजूस एक नाजूक रेष दिसते. ही रेष म्हणजे असंख्य ग्रह-तार्‍यांनी भरलेली एक आकाशगंगा आहे!

या आकाशगंगेचा हा ‘साईड व्ह्यू’ आहे. त्यामुळे ती या छायाचित्रात एखाद्या रेषेसारखी दिसून येते. ‘नासा’चे खगोलशास्त्रज्ञ कार्ल गॉर्डन यांनी सांगितले की हा नेब्युलाचाच एक भाग आहे याबाबत मी पैजच लावली होती आणि ती हरली! आम्ही ही प्रतिमा अतिशय काळजीपूवर्क दोन्ही इन्फ्रारेड कॅमेर्‍यातून पाहिल्यावर वस्तुस्थिती समोर आली. हा एका आकाशगंगेचा बाजूचा भाग आहे.

नेब्युला हा धूळ आणि वायूंचा एक विशाल ढगच असतो. हा नेब्यूला पृथ्वीपासून सुमारे 2 हजार प्रकाशवर्ष अंतरावर आहे. त्याच्या केंद्रात एक खुजा तारा आहे. त्याच्यापासून दूरपर्यंत एका मृत तार्‍याचे अवशेष आहेत. हा मृत तारा एकेकाळी सूर्यापेक्षा आठपटीने अधिक मोठा होता. जेम्स वेब टेलिस्कोपने करीना नेब्युलाचेही एक छायाचित्र टिपले आहे जे एखाद्या डोंगरासारखे दिसून येते. या ठिकाणाला ‘एनजीसी 3324’ या नावाने ओळखले जाते ज्याठिकाणी नवे तारे जन्माला येतात.

Back to top button