‘बीसीजी’ लस कोरोनावर गुणकारी असल्याचा दावा | पुढारी

‘बीसीजी’ लस कोरोनावर गुणकारी असल्याचा दावा

लंडन :

बि—टनमधील संशोधकांनी म्हटले आहे की ‘बीसीजी’ (बॅसिलस कॅलमेट-गुएरिन) लस कोरोना विषाणूवर गुणकारी आहे. या विषाणूवर लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. ही लस मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला अधिक बळकट करते. ही लस सध्या क्षयरोग प्रतिबंधक म्हणून दिली जाते. ‘सेल रिपोर्ट मेडिसिन’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. ज्या लोकांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात बीसीजी लस घेतलेली होती त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे क्वचितच दिसून आली.

‘बीसीजी’ लस टोचलेल्या लोकांना कोरोनापासून संरक्षण मिळू शकते, असे संशोधन यापूर्वीही झाले होते. दरम्यान, रशियाने म्हटले आहे की, जगाला कोरोनावरील पहिली लस या महिन्यात मिळू शकते. या लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून लवकरच ही लस बाजारात उपलब्ध होऊ शकेल. गामालेया इन्स्टिट्यूटने ही लस विकसित केली आहे. रशियात आणखी दोन कंपन्यांनी लसीच्या क्लिनिकल चाचण्यांसाठी परवानगी मागितली आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे की, ज्या देशामध्ये लस विकसित होईल त्या देशाने ती जगाबरोबर ‘शेअर’ केली पाहिजे.

Back to top button