पोशाख ‘रिपीट’ करणे वाईट नाही : भूमी | पुढारी

पोशाख ‘रिपीट’ करणे वाईट नाही : भूमी

मुंबई :

देश-विदेशातील अनेक लोक एखाद्या सेलिबि—टीने पूर्वी वापरलेलाच पोशाख एखाद्या कार्यक्रमात पुन्हा वापरला तर त्याचा गाजावाजा करीत असतात. जणू काही एखादा पोशाख एकदाच वापरावा असा जगात नियमच आहे! भूमी पेडणेकरने या मूर्खपणावर कोरडे ओढले आहेत. पोशाख ‘रिपीट’ करण्यात काहीच गैर नाही, असे करणे टाळू नका, असे तिने म्हटले आहे. ही एक चांगली सवय असून तिच्यामुळे पर्यावरणाचेही रक्षण होते असे तिचे म्हणणे आहे.

तिने म्हटले आहे की एखादा पोशाख पुन्हा पुन्हा वापरणे ही एक चांगलीच सवय आहे. मी स्वतः माझे पोशाख रिपीट करते. मला एकाच पोशाखात वारंवार पाहिल्याने लोक काय म्हणतील याचा मी मुळीच विचार करीत नाही. एक अभिनेत्री म्हणून लोक आम्ही सतत नवेच पोशाख परिधान करावेत अशी अपेक्षा ठेवतात. मला मात्र यामुळे काही फरक पडत नाही. मला यानिमित्ताने अनेक प्रकारच्या व्यवसायांची माहितीही मिळू शकली. लोकांना भाड्याने पोशाख उपलब्ध करून देणारेही व्यवसाय आहेत. मी पर्यावरणाचा विचार करणारी व्यक्‍ती आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात एखाद्या ब्रँडचा पोशाख परिधान करण्यापूर्वी मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते की हा ब्रँड पर्यावरणाबाबत किती जागरूक आहे. सध्या अशी काळजी घेणारे अनेक ब्रँड आहेत.

 

Back to top button