डायनासोरच्या नव्या प्रजातीचा लागला शोध | पुढारी

डायनासोरच्या नव्या प्रजातीचा लागला शोध

लंडन : संशोधकांनी इंग्लंडमध्ये डायनासोरच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. त्यांना या डायनासोरचे जीवाश्म मिळाले आहे. साऊथम्प्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना शांकलिन या ठिकाणी डायनासोरची चार हाडे गेल्यावर्षी सापडली असून त्यांचा अभ्यास केला जात होता. थेरोपॉड डायनासोरची ही नवी प्रजाती असल्याचे आता संशोधकांनी म्हटले आहे.

हे डायनासोर तब्बल 11 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर वावरत होते. ते अंदाजे तेरा फूट लांबीचे होते. त्यांना ‘व्हेक्टॅरोवेनेटोर इनोपिनेटस’ असे नाव देण्यात आले आहे. टायरॅनोसॉरस रेक्स (टी-रेक्स) व सध्याचे पक्षी ज्या कुळातील आहेत त्याच कुळाशी हे डायनासोरही संबंधित होते. त्यांच्या हाडांमध्ये हवेच्या मोठ्या पोकळ्या आहेत. त्यावरून त्यांना हे नाव देण्यात आले आहे. मान, पाठ आणि शेपटीच्या हाडांमध्ये अशा प्रकारच्या पोकळ्या असल्याचे आढळून आले आहे. या डायनासोरच्या शोधामुळे आता थेरोपॉडची उत्पत्ती जाणून घेणे संशोधकांना शक्य होणार आहे. त्यांच्या हाडांमध्ये जशा हवेच्या पोकळ्या आढळल्या आहेत तशाच सध्याच्या पक्ष्यांमध्येही आढळतात. त्यामुळे त्यांचा हाडांचा सांगाडा हलका होतो तसेच फुफ्फुसांप्रमाणे त्या श्‍वासोच्छ्वासाच्या यंत्रणेला मदतही करतात.

Back to top button