सोनू सूदकडून प्रेरणा घेऊन गावकर्‍यांनी बनवला रस्ता | पुढारी

सोनू सूदकडून प्रेरणा घेऊन गावकर्‍यांनी बनवला रस्ता

अमरावती :

स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे होऊनही आंध्र प्रदेशमधील विजयानगरम जिल्ह्यात ज्या ज्या गावात रस्ता नव्हता, त्या गावकर्‍यांनी अभिनेता सोनू सूद याने लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामातून प्रेरणा घेऊन श्रमदानातून आणि स्वखर्चातून रस्ता तयार केला. इतकेच नाही तर या कामाची प्रेरणा दिल्याबद्दल गावकर्‍यांनी सोनूची रस्त्याच्या कडेला पोस्टरही लावली आहेत. 

हा भाग आदिवसीबहुल आहे. लोकांनी आपल्या गावात रस्ता व्हावा म्हणून सरकारकडे अनेकदा विनंतीअर्ज केले; परंतु त्यांना मदत मिळाली नाही. चिंतामाला आणि कोडामा या दोन गावांत जवळपास 300 कुटुंबे राहत होती. डोंगराळ भाग असल्याने येथे रस्ता झाला नव्हता.

संबंधित बातम्या

लॉकडाऊनमध्ये देशाच्या विविध भागांत अडकून पडलेल्या मजुरांना अभिनेता सोनू सूदने स्वखर्चाने त्यांच्या गावी पोहोचवले. त्याने सरकारी मदतीची वाट पाहिली नाही. सोनूच्या या कार्यातून या गावकर्‍यांनी प्रेरणा घेतली आणि सरकारच्या जीवावर न बसता स्वत: हा रस्ता करण्याचे ठरवले. त्यासाठी प्रत्येक कुटुंबातून दोन हजार रुपये वर्गणी काढण्यात आली आणि श्रमदानातून रस्ता तयार केला. इतकेच नाही तर आपल्याला प्रेरणा देणार्‍या सोनू सूदची पोस्टर त्यांनी रस्त्याच्या कडेला लावून त्याचे आभार मानले आहेत.

Back to top button